Raigad Irshalwadi Landslide : एक होती इर्शाळवाडी

Raigad Irshalwadi Landslide : एक होती इर्शाळवाडी

Published on

अलिबाग; जयंत धुळप :  सारे काही सुखाने, आनंदाने आणि व्यवस्थित सुरू होते. पाऊससुद्धा समाधानकारक झाल्याने लावण्यासुद्धा पूर्ण होत आल्या होत्या. यंदा भात पीक, नाचणी, वरी यांची पिकेसुद्धा चांगली होणार अशा सर्व आनंदी वातावरणात खालापूर तालुक्यातील चौकजवळील इर्शाळवाडी या आदिवासी वाडीतील 48 घरांमधील कुटुंबे आनंदात होती. वाडीतील काही ग्रामस्थ कामानिमित्ताने बाहेर होते. 22 मुले आदिवासी आश्रमशाळेत होती. वाडीतील समाजमंदिरात काही मुले मोबाईलवर खेळत होती. वाडीतील मंडळी जेऊन झोपण्याच्या तयारीत होती, तर काही झोपली होती. इतक्यात बुधवारी रात्री 10 ते 10.15 च्या सुमारास काही तरी कोसळल्याचे आवाज आला. सर्वत्र अंधार झाला. मोबाईलवर खेळत बसलेल्या मुलांनी एकच आरडाओरडा केला… डोंगर पडला… डोंगर पडला.

गावात वाडीतील 48 घरांवर दगड, मातीची एक महाकाय दरड कोसळली होती. किनारी भागातल्या 4 ते 5 घरांतील ग्रामस्थांनादेखील या दरडीचा फटका बसला. ते कसेबसे जीव वाचवण्यासाठी घरातून बाहेर पडले. त्यांनी अंदाज घेतला. सार्‍या वाडीवरच दरड कोसळल्याचे त्यांच्या लक्षात आले. काहींनी आपल्या घरातील अन्य लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. पहिल्या टप्प्यात रात्री एकूण 23 जणांना वाचविण्यात यश आले. मिट्ट काळा अंधार, धो धो पाऊस आणि सोसाट्याचा वारा अशा अत्यंत भयाण परिस्थितीत दरड कोसळलेल्या अन्य घरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न बचावलेल्या ग्रामस्थांनी सुरू केला. परंतु, सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाल्याने अन्य लोकांच्या घरापर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. अखेर त्यांना स्वतःचा जीव सांभाळण्याशिवाय पर्याय उरला नाही.

त्याचवेळी गावातील कुणी एका तरुणाने पोलिस ठाण्याला फोन केला आणि वाडीवर दरड कोसळल्याची माहिती दिली. त्यानंतर काही वेळात छोट्या दरडीही कोसळल्या. परिणामी जीव बचावलेल्या या ग्रामस्थांनी वाडीच्या बाहेर येऊन स्वतःला सुरक्षित केले. या सगळ्या परिस्थितीत कुणी तरी येईल, मदत करेल, आपल्या अन्य ग्रामस्थांनाही वाचवतील, यासाठी सर्वांनी देवाचा धावा केला.

रात्री 12.30 च्या सुमारास खोपोली येथील यशवंत हायकर्स आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, पोलिस आणि काही सरकारी लोक इर्शाळवाडीच्या शोधात पोहोचले. नानीवले गावात हे सारे पोहोचले होते. तेथून वाडीवर येण्यासाठी अडीच तास पायवाटेने चालत पोहोचायला लागले. थेट रस्ता नसल्याने या वाडीवर कोणतेही वाहन पोहोचू शकत नाही. अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीत हे सर्व कार्यकर्ते बचावकार्यासाठी वाडीवर पोहोचले आणि दरडीच्या मार्‍यातून बचावलेल्या ग्रामस्थांचा जीव काहीसा भांड्यात पडला. बचाव गटाकडे असलेल्या बॅटर्‍यांच्या प्रकाशात कार्यकर्त्यांनी अंदाज घेत शोधकार्याला सुरुवात केली. परंतु, कमरेपेक्षा जास्त चिखलातून पुढे जात होते. चिखलाची खोली वाढतेय, असे लक्षात येताच त्यांना मागे फिरावे लागले. वाडीच्या रचनेची कल्पना नसल्यामुळे नेमके घर कुठे आहे, याचा अंदाजच येत नव्हता, अशी माहिती यशवंती हायकर्सचे पद्माकर गायकवाड यांनी दिली. बचावलेल्या ग्रामस्थांशी बोलताना ते दरडीच्या धक्क्यातून सावरले नसल्याचे दिसून आले. पहाटेपासून एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि अन्य बचाव पथके दाखल झाली आणि गाडलेल्या इर्शाळवाडीचा शोध सुरू झाला…

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news