काळजी घ्या! उष्माघाताचा धोका वाढला! वर्षीच्या तुलनेत यंदा त्रास अधिक | पुढारी

काळजी घ्या! उष्माघाताचा धोका वाढला! वर्षीच्या तुलनेत यंदा त्रास अधिक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात मार्च महिन्यापासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. दर वर्षीच्या तुलनेत यंदा उष्माघाताचा त्रासही वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मार्च ते मे या दोन महिन्यांच्या कालावधीत राज्यात 200 रुग्णांना उष्माघाताचा त्रास झाल्याचे नोंदवले गेले आहे. उन्हाळ्यात श्रमाची कामे करताना किंवा भरउन्हात प्रवास करताना थकवा येणे, भोवळ येणे, डीहायड्रेशन अशी लक्षणे दिसल्यास उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असते. उष्माघाताची लक्षणे, उपाययोजना याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे महापालिका, जिल्हा परिषदस्तरावर उष्माघाताच्या उपचारांसाठी विशेष कक्षही उभारण्यात आले आहेत.
आतापर्यंत राज्यात उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण नाशिक (23), बुलडाणा (21), धुळे, जालना (20 प्रत्येकी), सोलापूर (18), सिंधुदुर्ग (10) या जिल्ह्यांमध्ये आढळून आले. त्यामुळे या जिल्ह्यांना आरोग्य विभागाने विशेष अलर्ट दिला. तसेच उन्हापासून बचाव करण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले.  राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 41 होती. रुग्णसंख्या 26 एप्रिलपर्यंत 184 वर गेली. आता उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येने 200 चा टप्पा ओलांडला आहे. आजारावरील औषधांचा पुरेसा साठा रुग्णालयांत ठेवण्यास आरोग्य विभागाकडूनही सांगण्यात
आले आहे.
एक मार्चपासून उष्माघाताच्या रुग्णांची नोंद करण्यात येत असून, आतापर्यंत राज्यात 202 रुग्णांची नोंद झाली आहे. एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. याबाबत सर्व जिल्ह्यांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
– डॉ. राधाकिशन पवार,  सहसंचालक, आरोग्य विभाग.

हेही वाचा

Back to top button