कर्नाटकातील निवडणुकांसाठी भाजप महाराष्ट्रातील गावेही पळवू शकतो : उद्धव ठाकरे | पुढारी

कर्नाटकातील निवडणुकांसाठी भाजप महाराष्ट्रातील गावेही पळवू शकतो : उद्धव ठाकरे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामध्ये महाराष्ट्रातून पळविण्यात आलेल्या उद्योगांचे देखील योगदान आहे. ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच महाराष्ट्रातून उद्योग पळविण्यात आले. उद्या कर्नाटकच्या विजयासाठी भाजप महाराष्ट्रातून गावे पळविण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केली. राज्यातील सरकार हे महाराष्ट्रद्रोही आहे. या सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी 17 डिसेंबरला मुंबईत ‘न भूतो न भविष्यती’ असा मोर्चा काढेल, असेही ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेत्यांनी केलेली वक्तव्ये तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर राज्य सरकारने घेतलेल्या बोटचेप्या भूमिकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी 17 तारखेला मुंबई हल्लाबोल मोर्चा काढणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि घटक पक्षांची बैठक विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, आज जाणीवपूर्वक महाराष्ट्र तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कधी नव्हे ते सीमेवरील गावे आजूबाजूच्या राज्यात जाण्याची मागणी करत आहेत. मुंबई तोडण्याचे मनसुबेही आधीपासूनच आहेत. गुजरातच्या विजयासाठीच महाराष्ट्रातून उद्योग पळविण्यात आले. आता कर्नाटक विधानसभा निवडणुकासाठी महाराष्ट्रातील गावांचे लचके तोडण्याचे उद्योग सुरू आहेत. मराठी भाषिकांवर सातत्याने कानडी अत्याचार सुरू आहेत. हे अत्याचार पाहता ही दोन राज्ये एकाच देशातील आहेत की भारत-पाकिस्तान आहे, असा प्रश्न पडतो. महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले सुरू आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीतही एकाच पक्षाचे सरकार असताना हा प्रश्न सोडवण्यापेक्षा तो चिघळविला.

अधिक वाचा :

Back to top button