वारी बदलली; पण माऊलींवरील निष्ठा आणि वारकर्‍यांचा उत्साह कायम | पुढारी

वारी बदलली; पण माऊलींवरील निष्ठा आणि वारकर्‍यांचा उत्साह कायम

काळ बदलत गेला तसे वारीत अनेक बदल झाले. माऊलींवरील अपार निष्ठा आणि वारकर्‍यांचा उत्साह मात्र आजही तोच आहे. वारकर्‍यांना लागणारे सर्व साहित्य, गठुळी, शिधा नेण्यासाठी पूर्वीच्या काळी बैलगाड्या होत्या. संत तुकाराम महाराज कमिटीच्या वतीने प्रकाशित केलेल्या एका संदर्भपुस्तिकेनुसार संत तुकाराम महाराज वारीला पंढरपूरला जायचे तेव्हा त्यांच्यासोबत पाच हजार टाळकरी असत. तुकाराम महाराज स्वतः माऊलींच्या पादुका घेऊन जात. गुरुवर्य हैबतबाबा ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारमध्ये सेवेत असल्यामुळे त्यांनी वारीला सैनिकी शिस्त दिली. आज सोहळ्यात जी शिस्त दिसत आहे ती केवळ हैबतबाबां मुळेच. मुक्‍काम ठिकाणे कुठे असावीत, कशी असावीत यापासून किती अंतर चालून गेल्यावर विसावा असावा, किती दिवस मुक्‍काम असावा, या सर्वांचे नियोजन त्यांनीच लावले.

1990 पर्यंत पंढरीच्या वारीत सहभागी वारकर्‍यांची संख्या वीस ते पंचवीस हजार च्या दरम्यान होती, असे माऊलीच्या सोहळ्याचे प्रमुख विश्‍वस्त आणि चोपदार सांगतात. ज्ञानेश्‍वरीला तीनशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यभर ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा मोठ्या प्रमाणात सुरू झाला. पुढे संत तुकाराम महाराजांच्या गाथेलाही तीनशे वर्षे पूर्ण झाली आणि गाथा पारायण अनेक गावांत सुरू झाले. 2000 नंतर या वारीमध्ये सहभागी होणार्‍या वारकर्‍यांची संख्या लाखापर्यंत पोहोचली. 2010 नंतर मुख्य पालखी सोहळ्याबरोबरच मोकळ्या समाजात सहभागी होणार्‍या वारकर्‍यांची संख्या वाढत राहिली. पालखी सोहळ्यात कडक नियमावलीच्या बंधनात राहण्याऐवजी स्वतंत्रपणे अनेक छोट्या-मोठ्या दिंड्या माऊलींच्या समोर चालू लागल्या.

वारकर्‍यांच्या सेवेसाठी आणि जिथे सोहळ्याचा मुक्‍काम असतो अशा गावांसाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला. 2019 मध्ये महाराष्ट्र शासनाने स्वतःचा निधी देण्याबरोबरच सामाजिक संघटनांच्या मदतीने वारी निर्मल करण्यासाठी खूप प्रयत्न केले. वारी हळूहळू हायटेक होऊ लागली. वारी लाईव्ह दाखवली जाऊ लागली. माऊलींच्या दर्शनासाठी वारकरी येऊ लागले. त्यामुळेच पुणे, पिंपरी-चिंचवड, सासवड, लोणंदबरोबर फलटण, बारामती, इंदापूरसारख्या अनेक शहरांत माऊलींना भेटायला, दर्शनासाठी येणार्‍या वारकर्‍यांची संख्या गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढली. वारीमध्ये पूर्णवेळ सहभागी होऊ शकत नाही अशांनी काही टप्प्यावर आपण चालू शकतो का, असा विचार करून तेही वारीत सहभागी झाले. पुणे ते आळंदी, पुणे ते देहू, ते पुणे ते सासवड, लोणंद ते तरडगाव अशा अंतरावर माऊलीसोबत सोहळ्यात सहभागी होणार्‍या स्थानिक वारकर्‍यांची संख्या वाढली आहे. वारकर्‍यांचे आयुष्य आपल्याला जगता येत नसेल, तर किमान त्यांच्याबरोबर आणि पालखीसोबत किमान चालता येईल, अशी भाबडी अपेक्षा असणारे भाविक आता वारीत सहभागी होऊ लागलेले आहेत. (पूर्वार्ध)

Back to top button