सारख्या नावाच्या उमेदवारांचा ‘रायगड पॅटर्न’ अबाधित | पुढारी

सारख्या नावाच्या उमेदवारांचा ‘रायगड पॅटर्न’ अबाधित

अलिबाग; पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्ह्यात विधानसभा असो वा लोकसभा एकाच नावाचे अनेक?उमेदवार?उभे करण्याचा पॅटर्न आजही राबविला जात असल्याने, याचा फटका अनेक उमेदवारांना बसल्याचे दिसून आले आहे. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीतही अनंत गीते नावाच्या तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत.

रायगडात नामसाधर्म्य उमेदवार उभे करण्याची प्रथा काँग्रेसने सुरू केली. याचा मोठा फटका शेकापचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. दत्ता पाटील यांना बसला होता. अंतुले यांच्या विरोधात सन 1991 च्या लोकसभा निवडणुकीत शेकापने अ‍ॅड. दत्ता पाटील यांना?उभे केले होते. त्यावेळी त्यांच्याच नावाचा दत्ता पाटील नावाचा?उमेदवार उभा करण्यात आला. अर्थात, यामागे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. दत्ता खानविलकर यांची शक्कल होती. ती खूपच कामी आली. याचा मोठा फटका शेकापचे दत्ता पाटील यांना बसला. ड्युप्लिकेट दत्ता पाटील या?उमेदवाराला 15,645 मते पडली. तर शेकापचे अ‍ॅड. दत्ता पाटील यांना 1 लाख 79,933 मते मिळाली.

हाच ट्रेन्ड रायगडात रुजत गेला. 1996 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत तर दत्ता पाटील नावाचे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यामध्ये शेकापचे दत्ता पाटील यांच्यासह शेतकरी दत्ता पाटील, भाई दत्ता पाटील, दत्ता पाटील असे उमेदवार?उभे करण्यात आले होते. या तीन ड्युप्लिकेट दत्ता पाटील यांना एकूण 9,141 मते पडली होती. हाच पॅटर्न मग विधानसभा निवडणुकीतही राबविला जाऊ लागला. 2014 निवडणुकीतही असाच प्रकार घडला होता. राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे हे केवळ 2100 हजार मतांनी पराभूत झाले होते. त्यांच्याच नावाच्या सुनील तटकरे नामक उमेदवाराला 9,849 मते मिळाली होती.

यावेळीही हाच फंडा वापरला गेला आहे. आतापर्यंत?अनंत गीते नावाचे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात दाखल झालेले आहेत. शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या नावाचाही उमेदवार रायगडमधून उभा आहे. अनंत गीते विरुद्ध अनंत गीते अशी लढत होणार आहे. अनंत पद्मा गीते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. तर आता राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांच्या विरोधात सुनील तटकरे नावाने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. गत निवडणुकीत सुनील सखाराम तटकरे आणि सुनील पांडुरंग तटकरे यांनीही उमेदवारी अर्ज भरला होता. याआधी 2014 ला सुनील तटकरे विरुद्ध सुनील तटकरे असा अर्ज भरला गेला होता. त्यामुळे यावेळीही तीच राजकीय खेळी असल्याची चर्चा आहे. अनंत गीते आणि सुनील तटकरे या दोघांचीही डमी उमेदवारांमुळे चिंता वाढली आहे.
2004 मध्ये विधानसभा निवडणुकीत अलिबाग विधानसभा मतदार संघात मधुकर ठाकूर यांच्या नावाचे पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यावेळी मधुकर ठाकूर यांनासुद्धा यामुळे फटका बसला होता. याच निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत मीनाक्षी पाटील यांच्या नावाचे तब्बल बारा अर्ज दाखल केल्याने त्याचा फटका मीनाक्षी पाटील यांना बसला होता.

Back to top button