Lok Sabha Election 2024 : नकारात्मक प्रचारावर विरोधकांचा भर | पुढारी

Lok Sabha Election 2024 : नकारात्मक प्रचारावर विरोधकांचा भर

अशोक कुमार टंडन

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केल्यानंतर खर्‍या अर्थाने प्रचाराला रंग चढू लागल्याचे दिसून येते. प्रादेशिक पक्षदेखील जोरकसपणे निवडणूक लढवत आहेत. एनडीए आणि इंडिया दोन्ही आघाड्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचा भरणा असून, छोट्या पक्षांनाही स्थान देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने यावेळी चारशेहून अधिक जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. मोदी यांचे करिष्मादायी नेतृत्व ही एनडीएची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लागोपाठ तीन सार्वत्रिक निवडणुका जिंकण्याची किमया करून दाखविली होती. तशीच कामगिरी करून दाखविण्यासाठी नरेंद्र मोदी सज्ज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, विरोधी आघाडीने निव्वळ नकारात्मक प्रचार चालविल्याचे दिसून येते. मोदी हटाओ हा त्यांचा एकमेव कार्यक्रम बनला आहे. त्यांचा नकारात्मक प्रचार मतदारांना निराश करणारा आहे.

येत्या लोकसभा निवडणुकीत 543 जागांसाठी सात टप्प्यात मतदान होऊन अठराव्या लोकसभेचे निकाल 4 जून रोजी जाहीर होतील. पहिल्याच टप्प्यात 102 जागांसाठी, दुसर्‍या टप्प्यांत 89 जागांसाठी, तिसर्‍या टप्प्यात 94 जागांसाठी, चौथ्या टप्प्यात 96 जागांसाठी, पाचव्या टप्प्यात 49 जागांसाठी सहाव्या टप्प्यात 57 जागांसाठी, तर सातव्या टप्प्यात 57 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात वाराणसीचाही समावेश असून, तेथून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवित आहेत.

 पहिल्या टप्प्यातील 102 जागांमध्ये महाराष्ट्रातील 48 पैकी 5, राजस्थानातील 25 पैकी 12, तामिळनाडूतील सर्व 39, पुद्दुचेरीतील 1, उत्तर प्रदेशातील 80 पैकी 8, उत्तराखंडमधील सर्व 5, पश्चिम बंगालमधील 42 पैकी 3, जम्मू आणि काश्मीरमधील 5 पैकी 1, आसामातील 14 पैकी 5, बिहारमधील 40 पैकी 4, छत्तीसगडमधील 11 पैकी 1, मध्य प्रदेशातील 29 पैकी 6, अरुणाचल प्रदेशातील 2, त्रिपुरातील 2 पैकी 1, मणिपूर आणि मेघालयातील प्रत्येकी 1, तसेच अंदमान आणि निकोबार बेटावरील एका जागेसाठी मतदान होणार आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहार ही राज्ये आकाराने प्रचंड असल्यामुळे तेथे सात टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वतोपरी तयारी केली आहे.

उत्कंठावर्धक लढती

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यावेळी नागपूर या त्यांच्या पारंपरिक मतदार संघातून विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान आमदार विकास ठाकरे मैदानात उतरले आहेत. नागपूर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. गडकरी यांनी 2014 आणि पाठोपाठ 2019 मध्ये तेथून दणदणीत विजय मिळवला होता. मोदी सरकारमधील कार्यक्षम मंत्री आणि वैयक्तिक लोकप्रियता या दोन मुख्य घटकांच्या बळावर ते यावेळीही बाजी मारतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्रातील अशीच आणखी एक लक्षवेधी लढत चंद्रपूर लोकसभा मतदार संघात होत आहे. सहा वेळा तेथून आमदार म्हणून निवडून गेलेले आणि विद्यमान वन मंत्री सुधीर मुनगंटीवार प्रथमच लोकसभेची निवडणूक लढवित आहेत. वरोराच्या विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांना आव्हान दिले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रतिभा यांचे पती बाळू धानोरकर यांनी ही जागा भाजपचे हंसराज अहिर यांना पराभूत करून जिंकली होती.

राजस्थानातील बिकानेरमधून केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल चौथ्यांदा विजय मिळवण्याची आशा बाळगून आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने गोविंद राम मेघवाल यांना मैदानात उतरविले आहे. ही लढत चुरशीची होईल, असा अंदाज आहे. जम्मू-काश्मीरमधील उधमपूर मतदार संघात भाजपने यावेळी पुन्हा एकदा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी पहिल्याच निवडणुकीत गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या तालेवार नेत्याला धूळ चारली होती. दुसर्‍या वेळी त्यांनी विक्रमादित्य सिंह यांना आस्मान दाखविले होते. विक्रमादित्य हे काश्मीरच्या राजघराण्यातील डॉ. करण सिंह यांचे चिरंजीव आहेत. या दोन्ही निवडणुकांतील विजयांमुळे डॉ. जितेंद्र सिंह हे जायंट किलर म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. यावेळी ते विजयी हॅट्ट्रिकसाठी सज्ज आहेत. बिहारमधील जमुई मतदार संघातून लोकजनशक्ती पक्षाचे चिराग पासवान हेही रिंगणात उतरले असून, ते दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे चिरंजीव आहेत. मध्य प्रदेशातील छिंदवाडातून काँग्रसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे चिरंजीव नकुलनाथ मैदानात आहेत. गेल्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून काँग्रेसने ही एकमेव जागा जिंकली होती.

 उत्तर प्रदेशातून भाजपने वरुण गांधी यांना पिलीभीतमधून तिकीट नाकारून त्याऐवजी जतीन प्रसाद यांना संधी दिली आहे. ते योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळात मंत्री आहेत. दक्षिण भारताचा विचार केला तर तामिळनाडूमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. ए. अण्णामलाई हे प्रथमच कोईम्बतूर मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या विजयासाठी पक्षाने सारी ताकद पणाला लावली आहे.

Back to top button