Lok Sabha Election 2024 : सोशल मीडियावर रणधुमाळी | पुढारी

Lok Sabha Election 2024 : सोशल मीडियावर रणधुमाळी

- सुनील डोळे

सोशल मीडिया हा आजकाल परवलीचा शब्द बनला आहे. त्यामुळे कोणत्याही निवडणुकांत या आधुनिक तंत्राचा वापर होणे अपरिहार्य आहे. सध्या देशातील जवळपास प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. त्यामुळे प्रामुख्याने उमेदवारांचे काम खूपच सोपे झाले आहे. पदयात्रा, मतदारांशी वैयक्तिक संपर्क, कोपरा सभा यांचे महत्त्व आजसुद्धा कमी झालेले नाही. तथापि, त्याचबरोबर फेसबुक, व्हॉटस अ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम यासारख्या माध्यमांतून उमेदवार आपल्या पोस्ट टाकत आहेत. सोशल मीडिया म्हणजे प्रत्येक पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचारदूत बनला आहे. ‘सिलेक्शन बिफोर इलेक्शन’ या अभिनव संकल्पनेच्या आधारे राजकीय पक्ष थेट लोकांना उमेदवाराचे नाव विचारू शकतात आणि त्याद्वारे उमेदवाराची निवड करण्यात सुलभता येते.

काळ बदलला आणि त्यानुसार आचारसंहितेचे नियम अधिक कडक झाले. साहजिकच प्रचाराचा कालावधी कमी झाला. पारंपरिक प्रचाराची जागा आधुनिक तंत्रज्ञानाने घेतली. त्यामुळेे केवळ एका क्लिकने लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची सोय उमेदवारांना आयतेच उपलब्ध झाली.

तंत्रज्ञानाचा वापर वाढला

आधुनिक तंत्रनिवडणुकीचे तंत्रच बदलून गेले. पारंपरिक प्रचाराला छेद देऊन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत झाला. खरे सांगायचे तर याची सुरुवात त्यापूर्वीच अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या निवडणुकीतच केली होती. सोशल मीडियाचा वापर निवडणुकीसाठीही प्रभावीरीत्या करता येतो हे दिल्लीच्या निवडणुकीनंतरच कळले. त्यानंतर सोशल मीडिया सेल, वॉर रूम आदींमुळे टेक्नोसॅव्ही तरुणांची भरतीच विविध राजकीय पक्षांनी सुरू केली. स्वतंत्र यंत्रणा यासाठी कार्यान्वित करण्यात आली. 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत पारंपरिक प्रचार जवळपास लुप्त झाल्याचे दिसून आले. त्याची जागा पूर्णपणे सोशल मीडियाने घेतली. प्रत्येक इच्छुक उमेदवाराने आपापले सोशल मीडिया सेल वर्षभर आधीपासूनच कार्यान्वित केले. थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीचा पर्याय म्हणून सगळ्याच राजकीय पक्षांनी याचा पुरेपूर वापर करायला सुरुवात केली आहे. ही सगळी आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही तसेच चित्र दिसत आहे. त्यामुळे उत्तरोत्तर हायटेक प्रचाराचा फंडा वाढत जाईल, यात शंका नाही.

दृष्टिक्षेपात सोशल मीडिया

देशात 37.38 कोटी स्मार्टफोनचा वापर होतो
20 कोटी लोक व्हॉट्स अ‍ॅपवर
30 कोटी फेसबुकवर सक्रिय
3.44 कोटी लोक ट्विटरचा वापर करतात

Back to top button