लोकसभा निवडणूक : साताऱ्यात अटीतटीचे रणांगण | पुढारी

लोकसभा निवडणूक : साताऱ्यात अटीतटीचे रणांगण

संजीव कदम

सातारा :  संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील रणसंग्राम उमेदवार निश्चित नसतानाही चांगलाच पेटला आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होऊनही या मतदारसंघातील जागेचा तिढा सुटता सुटत नसल्याने इच्छुकांची कोंडी झाली आहे. महायुती व महाविकास आघाडी यांच्यातील रखडलेले जागावाटप व त्यामुळे निर्माण झालेला उमेदवारीचा सस्पेन्स यामुळे या मतदारसंघातील राजकीय अस्वस्थता कमालीची वाढली असून येथे शरद पवार गटाच्या ‘तुतारी’ची ललकारी घुमणार, भाजपचे ‘कमळ’ फुलणार की राष्ट्रवादीच्या (अजित पवार) घड्याळाची टिकटिक होणार, हे चित्र स्पष्ट होण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. असे असले तरी या मतदारसंघात छत्रपती उदयनराजे भोसले यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

लोकसभेचे बिगुल वाजल्याने आता खर्‍या अर्थाने राजकीय वातावरण तापले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ राज्याच्या राजकीय पटलावर सर्वाधिक लक्षवेधक ठरू लागला आहे. या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सातारा, वाई, कोरेगाव व पाटण या विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत तर कराड दक्षिण व कराड उत्तर या दोनच मतदारसंघातील आमदार महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट व शिवसेनेतील बंडाळी यामुळे येथील समीकरणे बदलली आहेत. सध्याचे येथील राजकीय बलाबल पाहता महायुतीची ताकद अधिक वाटत असली तरी शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातील लढाई महायुतीला वाटते तितकी सोपी नाही. येथील निकालावर कराड व पाटणचा फॅक्टर निर्णायक ठरत असल्याने महाविकास आघाडीसाठी ती जमेची बाजू समजली जाते.

गेल्या वेळच्या म्हणजेच 2019 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने तिसर्‍यांदा खा. उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली. महायुतीमधील शिवसेनेने त्यांच्याविरोधात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली. छत्रपती उदयनराजेंनी या निवडणुकीत नरेंद्र पाटील यांचा पराभव केला पण त्यांचे मताधिक्य कमालीचे घटले.
उदयनराजेंना या निवडणुकीत 5 लाख 79 हजार 26 मते मिळाली तर नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार 498 मते मिळाली. दरम्यानच्या काळात राज्यासह देशात भाजपचा चांगलाच बोलबाला निर्माण झाला होता. त्यातच स्थानिक राजकारणामधील घडामोडी पाहून खा. उदयनराजे यांनी या निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यांत खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत खा. उदयनराजेंना पराभवाचा सामना करावा लागला. उदयनराजेेंना 5 लाख 48 हजार 903 तर श्रीनिवास पाटील यांना 6 लाख 36 हजार 620 मते पडली.

महायुती व महाविकास आघाडी एकमेकांच्या राजकीय डावपेचांचा अंदाज बांधून हालचाली करत असल्यामुळे जागावाटप व उमेदवारीबाबत अंतिम क्षणीच आपले पत्ते ओपन करणार की काय, हे पाहावे लागणार आहे. ही जागा महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या गटाला सुटणार हे निश्चित आहे. शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचेच नाव आघाडीवर आहे. श्रीनिवास पाटील यांचे वय व सुपुत्र सारंग पाटील यांच्यासाठी त्यांचा असलेला आग्रह यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार नक्की कोण, हे कोडे काही केल्या उलगडत नाही. सारंग पाटील यांच्या नावाला कराड भागातून पसंती दिली जात असली तरी शरद पवार गटातील अंतर्गत धुसफूस काही लपून राहिलेली नाही. मात्र, पूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघाचा विचार करून उमेदवार द्यावा लागणार आहे. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार गटाकडून जिल्हाध्यक्ष सुनील माने हेही इच्छुक आहेत. आ. शशिकांत शिंदे यांनाही ऐनवेळी रणांगणात उतरवण्याची व्यूहरचना होऊ शकते.

महायुतीतून तीन घटक पक्ष या मतदारसंघावर दावा करत असून नक्की जागा कोणाला सुटणार याचा तिढा सुटलेला नाही. अजित पवार गटाने या मतदारसंघासाठी जोरदार दावा ठोकला आहे. आ. मकरंद पाटील यांचे बंधू व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील यांचे नाव त्यांच्याकडून पुढे करण्यात आले आहे. भाजपकडून छत्रपती उदयनराजे हेच सक्षम उमेदवार समजले जातात. भाजपच्या वाट्याला ही जागा आल्यास उदयनराजे यांचा दावा प्रबळ ठरणार असला तरी भाजप ऐनवेळी धक्कातंत्र अवलंबणार का, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाकडून पुरुषोत्तम जाधव व चंद्रकांत जाधव यांनी लोकसभेच्या मैदानात उतरण्याचा मानस बोलून दाखवला आहे. जागावाटप व उमेदवार निश्चितीचा सावळा गोंधळ एकीकडे सुरू असला तरी दुसरीकडे खासदार छत्रपती उदयनराजे यांनी मात्र मतदारसंघ पिंजून काढत निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे छत्रपती उदयनराजे हे अपक्ष, अजित पवार गट की भाजप यापैकी कोणाचे उमेदवार असतील, ऐनवेळी उदयनराजे महाविकास आघाडीचे तर उमेदवार नसतील ना, अशा राजकीय चर्चांना सध्या मतदारसंघात उधाण आले आहे. जो तो आपापल्या परीने अंदाज बांधू लागला आहे. काही दिवसांपूर्वी उदयनराजे समर्थकांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षांना घेराव घालून पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर न केल्याबद्दल संताप व्यक्त केला होता. सातार्‍यातील मराठा संघटनांनीही भाजप उदयनराजेंना अवमानकारक वागणूक देत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे सातार्‍यातील वातावरण चांगलेच पेटले आहे. उमेदवार निश्चितीनंतरच या मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Back to top button