Eid Ul Fitr 2024: आज चंद्रदर्शन घडल्यास उद्या रमजान ईद | पुढारी

Eid Ul Fitr 2024: आज चंद्रदर्शन घडल्यास उद्या रमजान ईद

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इस्लामी कालगणना चंद्रावर अवलंबून असते. मंगळवारी (दि. ९) चंद्रदर्शन घडल्यास मुस्लिमांचा पवित्र रमजानुल मुबारक या महिन्याची सांगता होईल, तसेच शाव्वाल-उल-मुकर्रम या महिन्याची सुरुवात होऊन बुधवारी (दि. १०) ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी होणार आहे. नाशिकचे खतीब-ए-शहर तथा मध्यवर्ती शाही मशीद चांद कमिटीचे अध्यक्ष हाफिज हिसामुद्दिन अशरफी यांनी चंद्र बघण्याचे आवाहन केले आहे.

मंगळवारी (दि. 9) रमजान पर्वाचा २९ वा रोजा आहे. यावर्षी रमजानमधील रोजांची संख्या २९ कि ३० असेल यावर सायंकाळी खुलासा होईल. कारण मंगळवारी चंद्रदर्शन घडले, तर रमजान पर्वाची सांगता होऊन ईदची सुरुवात होईल. असे न झाल्यास बुधवारी (दि. १०) ३० वा रोजा ठेवला जाईल. गुरुवारी (दि. ११) निश्चितपणे ईद साजरी केली जाईल.

नाशिक : मालेगाव शहरात अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी रात्री फेरफटका मारत व्यावसायिकांशी संवाद साधला

मेहंदीचे आकर्षण
रमजान ईद साजरी करीत असताना विशेषतः लहान मुलींमध्ये मेहंदी लावण्याची उत्कट इच्छा असते. यामुळे बाजारामध्ये विविध प्रकारची मेंदी पाहायला मिळते. सध्या बाजारात भिवंडी येथे उत्पादित अल्तमश किंग मेंदी कोन मागणीत आहे. याशिवाय गोल्डन मेंदी कोन, नखांवर लावण्यासाठी नाखुनी कोन, केसांना लावण्यासाठी विशिष्ट मेंदीच्या मागणीत वाढ झाल्याची माहिती मेंदी विक्रेता हाजी गयास अन्सारी यांनी दिली आहे.

पवित्र रमजान महिन्याचे २९ व्या रोजची इफ्तारी व मागरिबीची नमाज होताच आकाशात चंद्र बघण्याचे प्रयत्न करावे. चंद्रदर्शन झाल्यास घास बाजारातील मध्यवर्ती शाही मशिदीत याची माहिती द्यावी, जेणेकरून ईदचा सण घोषित करण्यास मदत मिळेल. ईदची सामूहिक नमाज एतिहासिक शाहजहानी ईदगाह मैदानावर ईदच्या दिवशी सकाळी १० वाजता होईल.
-हाफिज हिसामुद्दिन अशरफी
,
खतीब-ए-शहर तथा अध्यक्ष मध्यवर्ती शाही मशीद चांद कमिटीचे.

हेही वाचा:

Back to top button