ससूनमध्ये चाललंय काय? डॉक्टरांचे थेट खासगी औषधविक्रेत्यांशी साटेलोटे; रुग्ण बेजार | पुढारी

ससूनमध्ये चाललंय काय? डॉक्टरांचे थेट खासगी औषधविक्रेत्यांशी साटेलोटे; रुग्ण बेजार

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : ससूनचे काही डॉक्टर आणि खासगी औषधविक्रेत्यांचे साटेलोटे असल्याचे समोर आले आहे. ठरावीक कमिशनच्या लालसेपोटी डॉक्टर हे कृत्य करत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे डॉक्टरच खासगी औषधविक्रेत्यांचे खिसे भरत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. ससूनमध्ये उपलब्ध नसलेली औषधे खासगी औषधविक्रेते ‘ऑन द स्पॉट’ आणून देतात आणि नातेवाइकांकडून पैसे घेतात, ही बाब समोर आली आहे.

एकीकडे खिशात पैसे नसतील तरी आपल्याला उपचार नाकारले जाणार नाहीत, या आशेने दररोज हजारो रुग्ण ससून रुग्णालयात येतात. उपचारांसह आवश्यक औषधेही मोफत मिळत असल्याचा त्यांना विश्वास असतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून येथील परिस्थिती वेगळीच असल्याचे रुग्णांचे नातेवाईक सांगतात. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अनेक रुग्णांना बाहेरील औषधे घेणे परवडत नाही. मात्र, डॉक्टर बाहेरील औषधे रुग्णांसाठी रेफर करतात. नाईलाजास्तव नातेवाईकांना ती खरेदी केल्याशिवाय पर्याय उरत नाही.

पहा हे आहे वास्तव !

ससूनमधील अकरामजली इमारतीमध्ये एक रुग्ण पाय फ्रॅक्चर झाल्याने अ‍ॅडमिट होता. पायामध्ये प्लेट टाकण्यासाठी त्याने सात हजार रुपये भरले. रुग्णाला लागणारी काही औषधे ससूनमध्ये उपलब्ध नसल्याने एका डॉक्टरांनी रुग्णालयाबाहेरील औषधविक्रेत्याला मोबाईलवर औषधांची चिठ्ठी पाठवली. विक्रेत्याने काही वेळातच वॉर्डमध्ये औषधे आणून दिली आणि रुग्णाच्या नातेवाईकाकडून ऑनलाइन पैसे घेतले.

’झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी’ गेली कुठे ?

ससून रुग्णालयात मागील वर्षी ’झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी’ राबवण्याचा निर्णय झाला होता. रुग्णांना आवश्यक असणारी सर्व औषधे रुग्णालयातच उपलब्ध करून दिली जावीत, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. कोणत्याही विभागातील डॉक्टरांनी रुग्णांना बाहेरून औषधे आणण्याची चिठ्ठी देऊ नये आणि डॉक्टरांनी बाहेरून औषधे आणायला सांगितल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात अजूनही असे प्रकार सर्रास घडत असताना याला कसा पायबंद घालणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सामान्यांवर अरेरावी; औषधविक्रेत्यांना मोकळे रान !

ससून रुग्णालयात प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ, प्रत्येक मजल्यावर सुरक्षारक्षक तैनात असतात. रुग्णांना भेटायला येणारे नातेवाईक, कँटिनमध्ये जाणारे सामान्य नागरिक अशा अनेकांना ते दिवसभर हटकताना दिसतात. काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीने सुरक्षारक्षकांच्या अरेरावीबद्दल निवेदनही दिले होते. सामान्यांना अडवणारे सुरक्षारक्षक खासगी औषधविक्रेत्यांना वॉर्डपर्यंत कसे जाऊ देतात, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

पुढारीचा ‘रिअ‍ॅलिटी चेक’

ससूनमध्ये सुरू असलेल्या या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर त्याची ‘दैनिक पुढारी’च्या प्रतिनिधीने पडताळणी केली. एका औषधविक्रेत्याला फोन केला असता, त्याने तातडीने औषधे आणून देण्याचे कबूल केले. दुस-या एका वॉर्डमध्येही औषधे द्यायला जायचे असल्याने तुमच्या औषधांची चिठ्ठी लवकर पाठवा, असेही सांगितले. गरजू रुग्णांना जास्तीत जास्त औषधे मोफत उपलब्ध करून देणे आवश्यक असताना आणि जनऔषधी केंद्र आवारातच असताना खासगी औषधविक्रेत्यांचे खिसे भरण्याचे काम ससून रुग्णालयात सर्रास केले जात आहे, याबाबत अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा

Back to top button