Chhagan Bhujbal | …तर भुजबळांच्या रुपाने ‘माधव’ फॉर्म्युला पूर्णत्वास | पुढारी

Chhagan Bhujbal | ...तर भुजबळांच्या रुपाने 'माधव' फॉर्म्युला पूर्णत्वास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. किंबहुना भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वानेच भुजबळ यांचे नाव पुढे करत भुजबळांच्या माध्यमातून ओबीसी कार्ड खेळल्याचे बोलले जात आहे. यासाठी त्यांनी ‘माधव’ फॉर्म्युला पुढे आणला आहे. अर्थातच यामध्ये माळी, धनगर आणि वंजारी या समाजाला जाणीवपूर्वक पुढे आणण्याचा प्रयत्न आहे. (Chhagan Bhujbal )

छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे देशपातळीवरील नेते आहेत. ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मनोज जरांगे- पाटील आणि भुजबळ यांच्यातील वादंगानंतर ओबीसी समाज भुजबळांच्या पाठीशी एकवटला आहे. त्यामुळेच नाशिकच्या उमेदवारीवरून शिंदे गट की भाजप असा वाद सुरू असताना अचानक या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीच्या भुजबळांचे नाव पुढे करून भाजपकडून दुहेरी चाल खेळली जात आहे. या माध्यमातून भाजपने एकीकडे साताऱ्याची जागा राखली असून, दुसरीकडे नाशिकमध्ये भुजबळांचे नाव पुढे करून ओबीसी समाजालाही आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. नाशिकच्या जागेवर शिवसेनेच्या शिंदे गटाचा मूळ दावा आहे. या मतदारसंघातून शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे सलग दोन वेळा निवडून आले आहेत. तिसऱ्यांदा निवडून येत हॅट्ट्रिक करण्याची संधी असल्यामुळेच गोडसे यांनी उमेदवारीसाठी जंग जंग पछाडले आहे. त्यांनी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गेल्या दोन आठवड्यांत तब्बल तीन वेळा भेट घेत आपल्या उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत घेत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर शक्तिप्रदर्शनही केले होते. परंतु मुख्यमंत्र्यांकडून गोडसे यांना दिलासा मिळू शकलेला नाही. किंबहुना मुख्यमंत्री शिंदे यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू आहे. गोडसे यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनीही शब्द खर्च केला आहे. परंतु भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी भुजबळांसाठी आपला शब्द खर्ची केला आहे. यामागे राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील ओबीसी समाजाचे मतदान भाजपला पदरात पाडून घ्यायचे आहे. ‘अब की बार ४०० पार’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा वास्तवात उतरविण्यासाठी भुजबळांना उमेदवारी सहाय्यभूत ठरू शकणारी असल्याचे भाजपेयींचे म्हणणे आहे. त्यामुळेच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी नाशिकच्या जागेवर दावा केल्यानंतरही भाजप नेतृत्वाकडून उमेदवारीसाठी भुजबळांचेच नाव पुढे केले गेले. स्वपक्षातील इच्छुकांना तूर्त गप्प राहण्याचा सल्ला भाजप नेत्यांकडून दिला गेल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. ही चर्चा सुरू असताना, स्वत: भुजबळांनाही उमेदवारीसाठी आपल्या नावाची चर्चा सुरू आहे, याची कल्पना नव्हती. खुद्द भुजबळ यांनीच माध्यमांशी बोलताना याबाबत भाष्य केले आहे. ‘मी उमेदवारी मागितलेली नाही. माझी उमेदवारी दिल्लीतून निश्चित झालेली आहे. पक्षाने सांगितले म्हणून मी उमेदवारी करणार आहे.’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Chhagan Bhujbal )

मोदी, शाहांची सभा होणार! (Chhagan Bhujbal )

नाशिकमधून छगन भुजबळ यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर स्टार प्रचारकांच्या सभा नाशिकमध्ये रंगणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार आदी नेत्यांच्या सभा प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नाशिकमध्ये होणार आहेत.

हेही वाचा :

Back to top button