Lok Sabha Election 2024 | कडक उन्हात प्रचारही ‘तापणार’! | पुढारी

Lok Sabha Election 2024 | कडक उन्हात प्रचारही 'तापणार'!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
एकीकडे उमेदवारी निश्चितीवरून इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच रंगल्याने राजकीय वातावरण तापले असताना, उन्हाच्या तीव्र झळा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे ‘रण’ अधिकच तापवणाऱ्या ठरत आहेत. मार्चअखेर कमाल तापमान ३९ अंशांवर पोहोचल्यामुळे एप्रिल-मे महिन्यात उन्हाची तीव्रता काय असेल, या विचारानेच उमेदवार, इच्छुक तसेच कार्यकर्त्यांना धडकी भरली आहे.

कधीकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिकला गेल्या काही वर्षांत ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा चांगलाच फटका बसत आहे. कधी नव्हे, ते मार्च महिन्यात नाशिकचा पारा ३९ अंशांवर पोहोचला आहे. उन्हाच्या झळा जीव लाहीलाही करणाऱ्या ठरत आहेत. वाढते ऊन तापदायक ठरत आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीचा फडही सजला आहे. लोकसभा निवडणूक घोषित झाली आहे. देशात सात टप्प्यांत, तर राज्यात पाच टप्प्यांत या निवडणुकीचे मतदान होत आहे. नाशिक व दिंडोरी मतदारसंघांत शेवटच्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. उमेदवारीवरून इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महाविकास आघाडीने नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली असली, तरी महायुतीतील उमेदवारीवरून सुरू असलेला संघर्ष कायम आहे.

नाशिकची जागा राखण्यासाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन वेळा मुख्यमंत्र्यांच्या दारी शक्तिप्रदर्शन करूनही विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना शुक्रवारी (दि. 29) दुपारपर्यंत उमेदवारी जाहीर होऊ शकलेली नव्हती. नाशिकच्या जागेसाठी राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले असताना उन्हाचा वाढता तडाखा प्रचाराचे रण अधिकच तापवणारा ठरणार आहे.

महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाकडून नाशिकची उमेदवारी राजाभाऊ वाजे यांना बहाल करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. नाशिक मतदारसंघाची व्याप्ती मोठी आहे. दुपारी मोठ्या प्रमाणावर ऊन असल्यामुळे भल्या पहाटेपासूनच प्रचाराला सुरुवात केली जात आहे. दुपारी विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी पुन्हा प्रचार केला जात आहे. महायुतीचा उमेदवार जाहीर नसला, तरी इच्छुकांनी प्रचाराची संधी सोडलेली नाही. भर उन्हातही युतीचे कार्यकर्ते घरोघरी फिरून केंद्र व राज्य शासनाने घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवित आहेत. एप्रिल आणि मे महिन्यांत उन्हाचा तडाखा अधिकच वाढणार आहे. अशा परिस्थितीत प्रचारासाठी घराबाहेर पडताना कार्यकर्त्यांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

टोप्या, उपरणे आणि छत्र्या
वाढते ऊन लक्षात घेता, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना टोप्या, उपरणे उपलब्ध करून दिले आहेत. या टोप्या तसेच उपरण्यांवरच पक्षाचे नाव, चिन्ह नमूद करण्यात आले आहे. या टोप्या, उपरणांद्वारेही प्रचाराची संधी राजकीय पक्षांनी सोडलेली नाही. उन्हापासून कार्यकर्त्यांचा बचाव करण्यासाठी काही राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाच्या ध्वजाच्या रंगांच्या छत्र्या तयार केल्या असून, या छत्र्यांवरही राजकीय पक्षांची चिन्हे छापण्यात आली आहेत.

Back to top button