अवकाळी पाऊस : शेतकऱ्यांचे नुकसान! हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावला | पुढारी

अवकाळी पाऊस : शेतकऱ्यांचे नुकसान! हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावला

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात शुक्रवारी (दि.२९) दिवसभर ढगाळ हवामान निर्माण झाले. काही तालुक्यांमध्ये अवकाळीच्या हलक्या सरीदेखील बरसल्या. वातावरणातील या बदलामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना घामाच्या धारा लागल्या आहेत.

अरबी समुद्रापासून ते विदर्भापर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयाचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला आहे. मुंबई व कोकणाचा भाग सोडता अन्य राज्यात ढगाळ हवामान तयार झाले आहे. नाशिकही त्याला अपवाद ठरले नाही. मागील दोन दिवसांच्या तुलनेत नाशिक शहराच्या कमाल तापमानाच्या पाऱ्यात किंचित घट होऊन पारा ३७.४ अंशांवर स्थिरावला. त्याचवेळी किमान तापमान २३.४ अंश नोंदवले गेले. याचदरम्यान शहराच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. निफाड, सिन्नर, मालेगाव, चांदवड, बागलाण, लासलगाव आदी तालुक्यांत काहीकाळ पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या. उर्वरित दिवसभर ढगाळ हवामान कायम होते. दरम्यान, पुढील २४ तास नाशिकसह राज्यात ढगाळ हवामान कायम राहील. या काळात काही ठिकाणी हलक्या सरीदेखील पडतील, असा अंदाज आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानात कमालीची वाढ झाली आहे. दिवसा ४० ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असते. दुपारी घराबाहेर पडण्यास नागरिक धजावत नाहीत. त्यातच दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यातून शुक्रवारी (दि.२९) सकाळच्या सुमारास बरसात झाली. दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या रिमझिम पावसामुळे वातावरणात प्रारंभी काहीसा थंडावा निर्माण झाला. नंतर उकाडा वाढला. तालुक्यातील सोनीसांगवी, काजीसांगवी, विटावे, रेडगाव खुर्द, साळसाणे, पाटे, कोलटेक आदी गावात बेमोसमी पावसाने हजेरी लावली. दर सकाळी लासलगाव परिसरात हजेरी लावली.

चांदवडला हजेरी चांदवड दोन दिवसांच्या प्रचंड उकाड्यानंतर शुक्रवारी अवकाळी पावसाने चांदवड तालुक्यासह लासलगाव परिसरात हजेरी लावली. त्यामुळे घामांच्या धारांनी त्रस्त नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळाला. दरम्यान, अचानक पाऊस आल्याने उघड्यावरील चारा छाकण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली होती. शुक्रवारी सकाळी दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या रिमझिम पावसामुळे वातावरणात प्रारंभी काहीसा थंडावा निर्माण झाला. तालुक्यातील सोनीसांगवी, काजीसांगवी, विटावे, रेडगाव खुर्द, साळसाणे, पाटे, कोलटेक आदी गावात बेमोसमी पावसाने हजेरी लावली.

Back to top button