Lok Sabha Election 2024 | जळगाव, रावेरमध्ये महायुतीची महिला उमेदवारांवर मदार | पुढारी

Lok Sabha Election 2024 | जळगाव, रावेरमध्ये महायुतीची महिला उमेदवारांवर मदार

जळगाव : नरेंद्र पाटील

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर गत आठवठाडाभर उमेदवारीरून रणकंदन माजले आहे. विशेषत: सत्ताधारी महायुतीकडून इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने उमेदवारी जाहीर करताना पक्षश्रेष्ठींची चांगलीच धमछाक झाली. असे असले तरी महायुतीने या दोन्ही मतदारसंघात महिलांची उमेदवारी जाहीर करत महिलांना शंभर टक्के आरक्षण दिल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. परंतु, या उमेदवारीनंतर इतर इच्छुकांकडून बंडखोरीची शक्यता असल्याने महायुतीत थोडी चलबिचल, तर महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवारच जाहीर नसल्याने मविआत शांतता असल्याचे चित्र आहे.

जळगाव, रावेर या दोन्ही मतदारसंघांत महिला उमेदवार जाहीर झाल्यानंतर इच्छुकांसह काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे याबद्दल थेट राजीनामाच्या स्वरूपात रोष व्यक्त केला होता. विशेषत: रक्षा खडसे यांच्या उमेदवारीविरोधात थेट 200 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सोपविले होते. या प्रकरणावर यावर पडदा टाकण्याचे काम मंत्री गिरीश महाजन यांनी केले. तर दुसरीकडे महाआघाडीत प्रदेश महिला अध्यक्षाच बोलताना दिसून येत आहे. दुसरे कोणीच बोलताना दिसत नाही. रोहित पवार हे काही दिवसांपूर्वीच चोपडा येथे येऊन गेले त्यावेळी मविआमधील मतभेद समोर आले होते. मात्र, त्यांच्याकडून अद्याप उमेदवारच निश्चित नसल्याने सध्या तरी आघाडीत शांतता आहे, असेच म्हणावे लागे.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने दोन्ही ठिकाणी महिला उमेदवार जाहीर केले आहेत. सुरुवातीला रक्षा खडसे यांचा पत्ता कट होणार, असे दिसत असतानाच उमेश पाटील यांचा पत्ता कट झाला व त्या ठिकाणी गेल्या निवडणुकीत पत्ता कट झालेल्या स्मिता वाघ यांना संधी देण्यात आली. यामुळे मी भाजपचाच कार्यकर्ता काहीही झाले तरी भाजपचेच काम करणार, असे ठणकावून सांगणारे विद्यमान खासदार मात्र पक्षाच्या कार्यक्रमास लांब गेल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या चर्चेत किती सत्यता आहे हे नामनिर्देशन भरण्याच्या वेळेस समजून येईल. मात्र, आता जळगाव असो का रावेर लोकसभा असो या दोन्ही ठिकाणी भाजपच्या दोन्ही उमेदवारांविरुद्ध स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून रोष व्यक्त झाल्याने भाजपमध्ये सर्व काही आलबेल आहे, असे म्हणता येणार नाही.

दुसऱ्या बाजूला मंत्री महाजन यांनी भाजप उमेदवारांना चार लाखांपेक्षा जास्त लीड मिळेल, असा दावा केला आहे. महाआघाडीच्या उमेदवारीबाबत परिस्थिती पाहता भाजपमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये काहीशी नाराजी दिसत असली तरी एकूण परिस्थिती पाहता भाजप या दोन्ही मतदारसंघांत पुढे दिसत आहे. मविआमध्ये रावेर मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेल्याची चर्चा असून, संतोष चौधरी यांच्याकडून शरद पवार यांनी त्यांच्या उमेदवारीला होकार दिल्याचे सांगितले जाते. जिल्हाध्यक्ष रवींद्र भय्या यांचे नाव चर्चेत आहे. तर जळगाव मतदारसंघ कोणाकडे आहे हे अद्याप बाहेर आलेले नाही. मात्र, शिवसेनेने त्या ठिकाणी जोरदार तयारी सुरू केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चाचपणी केली आहे. तर काँग्रेसमधून भाजपत आलेले व नंतर निवडणूक तोंडावर शिवसेनेचा हात धरलेल्या अॅड. ललिता पाटील, भाजपचे माजी खासदार ए. टी. पाटील यांच्या पत्नी तसेच भाजपचे विद्यमान खासदार उमेश पाटील, अशी अनेक नावे चर्चेत आहेत. मात्र, उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहावे लागणार आहे.

रक्षा खडसेंना घरातून विरोधक

रक्षा खडसे यांची अर्धी ताकद असलेले त्यांचे सासरे एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी शरद पवार गटात गेलेले आहेत. तर त्यांच्या नंणद रोहिणी खडसे या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे घरातच विरोधक आहेत. तर बाहेरचे व पक्षातील विरोधक या सगळ्याचा सामना त्या कशा करणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे. दुसरीकडे जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ यांची ताकद कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवर अवलंबून आहे. त्यांची ढाल माजी जिल्हाध्यक्ष उदय बाबू सध्या त्यांच्यासोबत नसल्याने त्यांची काळजी वाढली आहे.

हेही वाचा :

Back to top button