Loksabha election : बारामती मतदारसंघासाठी सर्वाधिक मनुष्यबळ | पुढारी

Loksabha election : बारामती मतदारसंघासाठी सर्वाधिक मनुष्यबळ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक यशस्वी पार पडण्यासाठी 1 एप्रिलपासून 47 हजारांपेक्षा अधिक अधिकारी-कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. चारही लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक 10 हजार 64 मनुष्यबळ हे बारामती लोकसभा मतदारसंघासाठी असणार आहे. जिल्ह्यातील एकूण 8 हजार 382 मतदान केंद्रांवर प्रत्येकी 4 याप्रमाणे 33 हजार 528 मतदान कर्मचारी असतील. यापैकी मावळ लोकसभा मतदारसंघातील जिल्ह्यात येणार्‍या 3 विधानसभा मतदारसंघांत 1 हजार 339 मतदान केंद्रांसाठी 5 हजार 356, पुणे- 2 हजार 18 मतदान केंद्रांसाठी 8 हजार 72, बारामती- 2 हजार 516 मतदान केंद्रांसाठी 10 हजार 64 आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील 2 हजार 509 मतदान केंद्रांसाठी 10 हजार 36 कर्मचारी नियुक्त केले आहेत. जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांत मतदानासाठी एकूण 47 हजार 359 कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे.

एकूण मनुष्यबळापैकी सुमारे 40 टक्के महिला कर्मचारी असून, त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व कर्मचार्‍यांचे लोकसभा मतदारसंघ स्तरावर यादृच्छीकीकरण करून त्यांना मतदान केंद्रावर नेमण्यात येईल. सर्व कर्मचार्‍यांना प्रशिक्षणादरम्यान मतदान प्रक्रियेची नीट माहिती करून द्यावी आणि निवडणूक नियमांचे कटाक्षाने पालन होईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

सविस्तर प्रशिक्षण सत्र घेण्याचे निर्देश

मतदानासाठी नियुक्त सर्व कर्मचार्‍यांना संपूर्ण प्रक्रियेची माहिती व्हावी, यासाठी सविस्तर प्रशिक्षण सत्र आयोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. कर्मचार्‍यांना ईव्हीएमच्या प्रात्यक्षिकासह नियमांची माहिती प्रशिक्षणाद्वारे देण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती केली आहे. मतदान प्रक्रियेची नियमावली, घ्यावयाची खबरदारी, ईव्हीएम हाताळण्याची पद्धत यांविषयी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

अतिरिक्त मनुष्यबळाची असणार तयारी

मावळसाठी 1 हजार 607, पुणे- 2 हजार 422, बारामती- 3 हजार 19 आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी 3 हजार 11 याप्रमाणे प्रत्येकी 30 टक्के अतिरिक्त मनुष्यबळाचेही प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. त्याशिवाय चारही मतदारसंघ मिळून 3 हजार 773 कर्मचार्‍यांनाही प्रशिक्षण देण्यात येईल. मतदानाच्या वेळी आवश्यकतेनुसार या मनुष्यबळाचा उपयोग होणार आहे.

हेही वाचा

Back to top button