जळगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संपदा पाटील यांचे नाव चर्चेत | पुढारी

जळगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संपदा पाटील यांचे नाव चर्चेत

जळगाव : पुढारी ऑनालाइन डेस्क
भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ, तर रावेरमधून खासदार रक्षा खडसे यांना महायुतीकडून भाजप पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. असे असली तरी महाविकास आघाडीकडून कोणाला निवडणूक आखाड्यात उतरवायचे, यावर अजूनही निर्णय झालेला नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून भाजपने उमेदवारी नाकारलेले जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे रावेरसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उद्योजक श्रीराम पाटील, अ‍ॅड. रवींद्र पाटील यांची नावे घेतली जात आहेत.

जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघांत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १८ एप्रिलपासून सुरू होणार आहे. जळगावच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ व रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्याकडून संपूर्ण जिल्ह्यभर गाठीभेटींवर भर देण्यात येत आहे. तर भाजपने खासदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारुन स्मिता वाघ यांना संधी दिली, दुसरीकडे ठाकरे गटाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांच्या नावावर ठाकरे गटाकडून विचार करण्यात येत असल्याच्या चर्चा आहे. याशिवाय जळगावचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, अमळनेर येथील अ‍ॅड. ललिता पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत. संपदा पाटील यांनी मतदारसंघात विविध पदाधिकार्‍यांशी तसेच कार्यकर्त्यांशीही चर्चा केली. उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारल्यामुळे भाजप अंतर्गत नाराजी दिसून येत आहे. त्याचा लाभ घेण्याची ठाकरे गटाची योजना असून संपदा पाटील यांच्या उमेदवारीची शक्यता आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे असून, काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांचेही मत उमेदवारीसंदर्भात जाणून घेण्यात आल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. आमदार एकनाथ खडसे यांनी मत मांडत आमदार चौधरी यांनी सुचविलेल्या आथिकदृष्ट्या सक्षम उद्योजक श्रीराम पाटील यांच्या नावाला दुजोरा दिल्याचे सांगितले जात आहे. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, मुक्ताईनगरचे विनोद सोनवणे, तृप्ती बढे यांची नावेही पुढे आल्याने नेमकी कोणते नाव निश्चित होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

उद्धव ठाकरे ७ मे रोजी जळगाव, रावेरमध्ये येणार
जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ७ मे रोजी जळगाव मतदारसंघात २ आणि रावेर मतदारसंघात १ प्रचारसभा होणार आहे. अद्याप तरी उमेदवाराचे नाव जाहीर झाले नसले तरी पदाधिकारी व कार्यकर्ते ठाकरे गटाचे मशाल चिन्ह घराघरांपर्यंत पोहोचवत असल्याचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा:

Back to top button