नाशिकमध्ये ‘वंचित’च्या तिकिटावर मराठा उमेदवार | पुढारी

नाशिकमध्ये 'वंचित'च्या तिकिटावर मराठा उमेदवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाविकास आघाडीसोबत घरोबा होऊ शकला नसल्याने, वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतल्याने राज्यात नवीन समीकरणाची बीजे पेरली आहेत. दि. ३० मार्चपर्यंत या नव्या समीकरणाचे भवितव्य निश्चित होणार असले, तरी नाशिकमध्ये ‘वंचित’च्या तिकिटावर मराठा उमेदवार लढणार आहे. खुद्द ‘वंचित’च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीच यास दुजोरा दिला आहे.

वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटपाचा तिढा अखेरपर्यंत सुटला नसल्याने, ‘वंचित’ने आपल्या वाटा निवडण्यास सुरुवात केली आहे. ‘वंचित’ नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची बुधवारी (दि. २७) भेट घेतल्याने, राज्यात नवे समीकरण जुळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच मराठा समाज प्रत्येक मतदारसंघात आपला एक अपक्ष उमेदवार उभा करणार असल्याने, हे उमेदवार वंचित पुरस्कृत असण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये हे सूत्र जुळण्याची शक्यता असून, उमेदवाराच्या नावावर गुरुवारी (दि. २८) मराठा समाजाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होऊ शकते.

दरम्यान, ‘वंचित’च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मते, वरिष्ठ स्तरावर महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा निर्णय झाल्याने, नाशिकसह दिंडोरीतदेखील ‘वंचित’चा उमेदवार रिंगणात उतरविला जाणार आहे. नाशिकमध्ये मराठा समाज पुरस्कृत ‘वंचित’चा उमेदवार असणार आहे. हा उमेदवार ‘वंचित’चे तिकीट आणि निशाणीवर लढणार आहे. ‘वंचित’कडून मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मराठा उमेदवाराचे नाव मागे पडल्यास ‘वंचित’कडून अविनाश शिंदे किंवा पवन पवार यांच्यापैकी एकाचे नाव निश्चित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

वरिष्ठांकडून लोकसभेसाठी कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाशिकमधून आम्ही मराठा समाजातील उमेदवार देण्याची तयारी करीत असून, करण गायकर यांचे नाव आघाडीवर आहे. ३० मार्चपर्यंत उमेदवारीवर अंतिम निर्णय होणार आहे. – अविनाश शिंदे, महानगरप्रमुख, ‘वंचित’.

Back to top button