छत्रपतींच्या वंशजांना ताटकळत ठेवणे हा अपमानच : अनिल गोटे यांची भाजपा नेत्यांवर टीका | पुढारी

छत्रपतींच्या वंशजांना ताटकळत ठेवणे हा अपमानच : अनिल गोटे यांची भाजपा नेत्यांवर टीका

धुळे : पुढारी वृत्तसेवा- भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीतील नेत्यांनी छत्रपतींच्या वंशजांनाच तिकीटासाठी ताटकळत ठेवून महाराजांचा आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाचा एक प्रकारे अपमानच केला आहे, अशी टीका आज माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.

सातारा लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात छत्रपतींचे वंशज उदयनराजे भोसले हे सध्या दिल्ली येथे गेले आहेत. त्यांना गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीतील भाजप नेत्यांची भेट झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आज लोकसंग्रामचे नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्रातील महायुतीतील नेत्यांवर टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल ३५० वर्षापुर्वी तत्कालीन व्यापारी शहर असलेल्या सुरतेतील वखारी लुटल्या होत्या. महाराजांच्या जीवनातील सुरतेची लूट व आग्ग्राहुन सुटका, अफझलखानचा वध इत्यादी प्रसंग जगाच्या इतिहासात नोंदले गेले आहेत. त्याच गुजराथचे नेते महाराष्ट्रातील गुजरात धार्जीन्या मराठी नेत्यांना लाचार करून छत्रपती शिवरायांचा सूड उगवत आहेत असा गंभीर आरोप गोटे यांनी केला.

शिंदे , पवारांची अवस्था घंटी वाजवल्यासाऱखी

महाराष्ट्रातील गुजराथ धार्जीन्या उच्चवर्णीय नेत्यांना हाताशी धरून आता त्यांनी प्रत्यक्ष छत्रपतींच्या वंशजांचाच अपमान करण्यापर्यंत मजल गेली आहे. शिवरायांचे वंशज साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना तीन दिवसांपासून भेटीसाठी वेळ न देता तिकीटासाठी लटकत ठेवले आहे. यापुर्वी साताऱ्यांची जन्मभुमी असलेले मराठा नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बारामतीचे अजित पवार यांची अवस्था तर घंटी वाजवल्या नंतर धावत येणाऱ्या शिपायासारखी करून टाकली आहे. अशी टीका गोटे यांनी केली आहे

दिल्ली वाऱ्याकरून सुध्दा दिल्लीतल्या शंहशहा व बादशहाने नुसती आश्वासनाची खैरात करून बोळवण केली आहे. दिल्ली वारी करण्याकरीता विमानात बसण्यापुर्वी महाराष्ट्रातील जनतेला ‘आता यादी मान्य होईल’ असे सांगून बसतात. दिल्लीला जावून नेत्यांच्या वेटींग लिस्ट मध्ये नाव नोंदवून तासंतास ताटकळत बसतात. बाहेर आल्यावर कसलेल्या कलाकारांप्रमाणे चेहऱ्यावर हास्य आणून सांगतात की, ‘दोन दिवसांनी पुन्हा आम्ही बसणार आहोत’. महाराष्ट्राची कधी नव्हे, एवढी अब्रू देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केली आहे. दिल्लीश्वरांच्या दरबारात सरदारांच्या रांगेमध्ये उभे केले, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष औरंगजेबाला ललकारले होते. त्या शिवरायांचा महाराष्ट्र आज दिल्लीश्वरांच्या चरणी लोटांगण घालीत आहेत. यापेक्षा महाराष्ट्राचे दुर्देव काय आहे?, असा सवाल लोकसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार, अनिल गोटे यांनी केला आहे.

हेही वाचा :

Back to top button