रायगडच्या बदल्यात नाशिक द्या! शरद पवार गटाची ठाकरे गटाकडे मागणी; महाविकास आघाडीतील संघर्ष टोकाला | पुढारी

रायगडच्या बदल्यात नाशिक द्या! शरद पवार गटाची ठाकरे गटाकडे मागणी; महाविकास आघाडीतील संघर्ष टोकाला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकच्या जागेवरून महायुतीत रंगलेला वाद थेट अमित शाह यांच्या दरबारी पोहोचल्यानंतर महाविकास आघाडीही नाशिकच्या जागेवरून सुरू असलेला संघर्ष मिटता मिटेना झाल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने नाशिकसाठी विजय करंजकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने त्यास आक्षेप घेतला असून, रायगडमध्ये राष्ट्रवादीचा खासदार असतानाही, अनंत गितेंसाठी आम्ही जागा दिली, त्यामुळे रायगडच्या बदल्यात नाशिक द्या, अशी भूमिका शरद पवार गटाने घेतल्याने महाविकास आघाडीतील संघर्ष टोकाला गेला आहे.

नाशिकमध्ये शिवसेनेचा खासदार असल्यामुळे नाशिकची जागा ठाकरे गटाने आम्हालाच मिळावी, असा दावा केला आहे. ठाकरे गटाने विजय करंजकर यांची उमेदवारीदेखील जाहीर केली आहे. मात्र, आता महायुतीकडून गोडसे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्यानंतर नाशिकच्या उमेदवारीबाबत ठाकरे गटाकडून फेरविचार केला जात आहे. माजी आमदार राजाभाऊ वाजे आणि मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांचे नाव महाविकास आघाडीत चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून या जागेवर पुन्हा दावा करण्यात आला आहे. तर ठाकरे गटाने विद्यमान खासदाराकडे बोट दाखवत, जागेवरील दावा फेटाळला आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने यासाठी रायगडच्या जागेची आठवण ठाकरे गटाला करून दिली आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे खासदार असतानाही, ही जागा अनंत गितेंसाठी आम्ही सोडली. त्यामुळे तुम्ही रायगडच्या बदल्यात आम्हाला नाशिक द्या, अशी मागणी पुढे रेटल्याने आता ठाकरे गटासमोर पेच निर्माण झाला आहे.

रायगडची जागा आमची असतानाही आम्ही ती शिवसेना ठाकरे गटाला दिली. त्यामुळे रायगडच्या बदल्यात ठाकरे गटाने नाशिक आम्हाला द्यावी. आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत. – गोकुळ पिंगळे, उपाध्यक्ष, शरद पवार गट

नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे नाशिकची जागा ही शिवसेने (ठाकरे गटा)ची असून, येथे शिवसेनेचाच खासदार होईल. आमच्याकडे सक्षम उमेदवार असून, घटक पक्षांना जागा सोडण्याचा प्रश्न येत नाही. – सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख, ठाकरे गट


Back to top button