Pune : हे चाललंय काय? सकाळी स्वच्छता; दुपारनंतर पुन्हा कचरा | पुढारी

Pune : हे चाललंय काय? सकाळी स्वच्छता; दुपारनंतर पुन्हा कचरा

प्रसाद जगताप

पुणे : तळजाई पठार, विणकर सभागृह, नवग्रह मारुती मंदिर, शंकर महाराज वसाहत यांसह धनकवडी भागातील झोपडपट्टी भागांमध्येही पहाटे महापालिका कर्मचार्‍यांकडून कचर्‍याच्या ढिगांची स्वच्छता केली जाते. मात्र, कर्मचारी जाताच दुपारनंतर पुन्हा स्थानिक नागरिकांकडून कचरा टाकायला सुरुवात होते. त्यामुळे सकाळी स्वच्छता केली तरी कर्मचार्‍यांना येथे पुन्हा सातत्याने साफसफाई करावी लागत आहे.

महापालिका प्रशासनाने ‘स्वच्छ’ संस्थेमार्फत कचरा उचलण्याची सेवा सुरू केली आहे. मात्र, परवडत नसल्यामुळे झोपडपट्टी भागातील अनेक नागरिक या सेवेचा लाभ घेत नाहीत. त्यामुळे झोपडपट्टी भागात अनेक ठिकाणी कचरा पडलेला दिसतो. यासंदर्भातील पाहणी दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधींकडून केली जात आहे. नुकतीच धनकवडी भागातील तळजाई, शंकर महाराज वसाहतसह अन्य झोपडपट्टी भागात पाहणी करण्यात आली. त्या वेळी येथील झोपडपट्टी भागात काही ठिकाणी सर्रासपणे नागरिकांकडून रस्त्याशेजारीच कचरा फेकला जात असल्याचे पाहायला मिळाले.

…म्हणून टाकतात नागरिक कचरा

हातावरचे पोट असणारी आणि आज कमावलं तरच खायला मिळेलं, अशी स्थिती असलेली लोकं झोपडपट्टी भागामध्ये राहतात. महिन्याचे लाईट बिल भरायचं म्हटलं तरी अनेकदा विचार करणारे, गॅसचे पैसे राखून, घरखर्च सांभाळणारे नागरिक येथे राहतात, त्यांच्या पगाराच्या खर्चात आता ‘स्वच्छ’ संस्थेच्या महिना 70 ते 80 रुपये खर्चाची आणि त्यांनाच द्याव्या लागणार्‍या दिवाळी बक्षिसाची भर पडत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने किमान झोपडपट्टी भागात तरी ‘स्वच्छ’ संस्थेची सेवा मोफत द्यावी, अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.

या भागांना ‘स्वच्छ’ सेवा मोफत द्या

धनकवडी भागातील चव्हाणनगर, शंकर महाराज वसाहत, विणकर सभागृह, शनिमंदिरजवळ (तीन हत्ती चौकाजवळ), तळजाई झोपडपट्टी, आंबेगाव पठार, सहकारनगर, आंबेडकरनगर, आंबील ओढा परिसरातील नागरिकांकडून ‘स्वच्छ’ची सेवा न वापरताच रात्रीच्या वेळी कचरा रस्त्यालगत टाकल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिकेने लावलेली ही सेवा परवडत नसल्यामुळे येथील नागरिकांकडून अशाप्रकारे कचरा टाकला जात आहे. त्यामुळे या भागांसह शहरातील ज्याठिकाणी झोपडपट्टी भाग आहे, तेथे ही सेवा मोफत द्यावी, अशी मागणी होत आहे.

पंतप्रधान आवास प्रकल्पांमध्येही सेवा मोफत द्या

महापालिका प्रशासनाकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्या ठिकाणी देखील सर्वसामान्य नागरिकच राहतात. त्यांना अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जात घरसंसार सांभाळावे लागत आहे. त्यामुळे या प्रकल्पामधील रहिवाशांना देखील ‘स्वच्छ’ संस्थेची सेवा मोफत मिळावी, अशी मागणी होत आहे.

काम करेल, तरच त्या दिवशी खायला मिळेल, असे लोक झोपडपट्टी भागात राहतात. महिनाअखेर यायच्या आतच त्यांच्यासमोर आर्थिक चणचण उभी राहते. घरसंसार कसा चालवायचा, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा असतो. त्यातच आता ही ‘स्वच्छ’ची कचरा टाकण्यासाठी पैसे घेणारी योजना परवडणारी नाही. दिवाळी आली की द्या त्यांना बक्षीस, सांगा आम्ही घर कसे चालवायचे, त्यामुळे महापालिका प्रशासनाने किमान झोपडपट्टी भागात तरी ही सेवा मोफत द्यावी. यामुळे झोपडपट्टी भाग कचरामुक्त होण्यास मदत होईल.

– रमेश खरात, नागरिक

हेही वाचा

Back to top button