वंचित पुन्हा ठरणार ‘गेमचेंजर’, मविआमध्ये धाकधुक वाढली | Lok Sabha Election 2024 | पुढारी

वंचित पुन्हा ठरणार 'गेमचेंजर', मविआमध्ये धाकधुक वाढली | Lok Sabha Election 2024

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमधील जागा वाटपाची चर्चा जवळपास संपुष्टात आल्याने, मविआमध्ये धाकधुक वाढली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी जाईंट किलर ठरलेले वंचित यावेळी देखील गेमचेंजर ठरू शकतो. विशेषत: नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघात वंचितची मते निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Lok Sabha Election 2024)

२०१९ च्या लाेकसभा निवडणुकीत देखील आघाडीत वंचितला सहभागी करून घेण्यावरून बिघाडी झाल्याने, त्याचा मोठा फटका आघाडीतील पक्षांना बसला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ‘वंचित बहुजन आघाडी’च्या एकूण मतांची टक्केवारी ही १४ टक्के होती. कोणत्याही निवडणुकीत ही टक्केवारी कमालीची निर्णायक आहे. लोकसभेला त्यांच्यासोबत ‘एमआयएम’ होती, पण विधानसभेच्या वेळेस वंचित एकटीच लढली. तेव्हा त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही, पण त्यांनी जवळपास ५ टक्के मते राज्यभरात घेतली. त्यामुळे आघाडीचे किमान २३ जागांवर उमेदवार पराभूत झाल्याचे तेव्हा बोलले गेले. महाराष्ट्रात दलित आणि मुस्लिम मतांची संख्या निर्णायक असून, त्यावर वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा मोठा प्रभाव आहे. याशिवाय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू असल्याने, महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे वलय आहे. यासर्व पार्श्वभूमीवर ज्या पक्षांना वंचितचे पाठबळ मिळेल, तिथे त्या पक्षाची बाजू भक्कम होईल, असे समीकरण आहे. मात्र, मविआ आणि वंचितमध्ये अखेरपर्यंत समेट घडून येऊ न शकल्याने, दलित आणि मुस्लिम मतांना आपलेसे करण्यासाठी मविआला कसोशिने प्रयत्न करावे लागणार आहेत. (Lok Sabha Election 2024)

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघाचा विचार केल्यास, २०१९ च्या निवडणूकीत या दोन्ही मतदार संघात वंचितच्या उमेदवाराने चांगली कामगिरी केली होती. नाशिक लोकसभा मतदार संघात वंचितचा उमेदवार चौथ्या स्थानावर होता. त्याने एक लाखांपेक्षा अधिक मते मिळविली होती. तसेच दिंडोरी लोकसभा मतदार संघात देखील वंचितच्या पारड्यात मोठ्या प्रमाणात मते पडली होती. दरम्यान, मविआत सहभागी होण्याचे प्रयत्न जवळपास संपुष्टात आल्याने, वंचितने या दोन्ही मतदार संघात आपले उमेदवार उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अशात २०१९ ची पूर्नरावृत्ती यावेळी होणार काय? हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. (Lok Sabha Election 2024)

मविआत सहभागी होण्याबाबतची चर्चा अजुनही सुरूच असून दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल. मात्र, आम्ही, नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदार संघात काम सुरू केले असून वरिष्ठ स्तरावरून आदेश प्राप्त होताच अधिकृत उमेदवारांची घोषणा केली जाईल.

अविनाश शिंदे, शहराध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

२०१९ ची आकडेवारी दृष्टीपथात

नाशिक लोकसभा मतदार संघ

हेमंत गोडसे (शिवसेना) – ५, ६३,५९९

समीर भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस) – २,७१,३९५

माणिकराव कोकटे (अपक्ष) – १,३४,५२७

पवन पवार (वंचित) – १,०९,९८१

दिंडोरी लोकसभा मतदार संघ

भारती पवार (भाजपा) – ५,६७,४७०

धनराज महाले (राष्ट्रवादी काँग्रेस) – ३,६८,६९१

जे. पी. गावित (माकपा) – १,०९,५७०

बापू बरडे (वंचित) – ५८,८४७

हेही वाचा :

Back to top button