नागपूर : पहिल्या टप्प्यात काँग्रेस कोणाला देणार ‘हात’ आज ठरणार | पुढारी

नागपूर : पहिल्या टप्प्यात काँग्रेस कोणाला देणार 'हात' आज ठरणार

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यात विदर्भातील पाच जागांचा समावेश आहे. काँग्रेसचा कोणता उमेदवार रिंगणात उतरणार यासाठी पक्षाच्या गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. अर्थातच काँग्रेस कुणाला ‘हात’ देणार या विषयीची स्पष्टता काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत आज (बुधवार) होण्याची शक्यता आहे. राज्याचे प्रभारी रमेश चेनिथला, महाराष्ट्रातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत काँग्रेसची मंगळवारी मॅरेथॉन बैठक पार पडली. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांच्यासोबत महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची चर्चा झाली असून यातून काही नावं समोर आली आहेत.

दरम्यान या बैठकीनंतर आज पुन्हा एकदा काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडणार आहे. संध्याकाळी 4 वाजता महाराष्ट्राच्या लोकसभा उमेदवारांबाबत निर्णय घेण्यासाठी ही बैठक होईल. केंद्रीय निवडणूक समितीच्या या बैठकीनंतर राज्यातील उमेदवारांची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

काँग्रेसच्या ज्या उमेदवारांची नावे आघाडीवर आहेत त्यामध्ये नागपूरमधून शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरेंचे नाव आघाडीवर असून, त्यांना उमेदवारी मिळाली तर त्यांची लढत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरुद्ध होणार आहे. नागपुरात 12 वेळा काँग्रेस निवडून आल्यामुळे हा काँग्रेसचाच गड आहे. केवळ तीनदा भाजप निवडून आल्यामुळे नागपूर भाजपचा मतदारसंघ होत नाही. आम्ही चांगली लढत देऊ, जेष्ठ नेत्यांनी आपले नाव हायकमांडकडे पाठविले आहे. माझी सुरुवातीपासून लढण्याची इच्छा नव्हती, मात्र पक्षाचा आदेश असेल तर लढावेच लागेल असे आमदार विकास ठाकरे यांनी ‘पुढारी’शी बोलताना स्पष्ट केले. यासोबतच अमरावती लोकसभा मतदारसंघात आमदार बळवंत वानखेडे यांचे नाव आघाडीवर आहे.

रामटेकहून माजी मंत्री डॉ नितीन राऊत, रश्मी बर्वे आणि आमदार राजू पारवे यांच्या नावांची चर्चा आहे. राजू पारवे महायुतीचे उमेदवार झाल्यास डॉ नितीन राऊत किंवा केदार गटाच्या रश्मी बर्वे रामटेकला उमेदवार असणार आहेत. गडचिरोलीहून डॉ. नामदेव उसेंडी यांचे नाव आघाडीवर आहे, तर चंद्रपूरमधून विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे, प्रतिभा धानोरकर यांची नावं आघाडीवर असून, प्रतिष्ठेच्या कोल्हापूर मतदारसंघात शाहू महाराजांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. याशिवाय भिवंडीहून नामदेव चोरगे यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे.

हेही वाचा : 

Back to top button