सिद्धू मुसेवालाच्‍या आईवरील IVF उपचाराबाबत आराेग्‍य मंत्रालयाची पंजाब सरकारला नोटीस | पुढारी

सिद्धू मुसेवालाच्‍या आईवरील IVF उपचाराबाबत आराेग्‍य मंत्रालयाची पंजाब सरकारला नोटीस

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंजाबमधील दिवंगत गायक सिद्धू मुसेवाला याच्या ५८ वर्षीय आई चरण कौर यांनी नुकताच IVF उपचारांतून मुलाला जन्‍म दिला आहे. याप्रकरणी केंद्रीय आरोग्‍य आणि कुटुंब कल्‍याण मंत्रालयाने पंजाब सरकारला नोटीस बजावली आहे.

या प्रकरणी केंद्र सरकारने पंजाब सरकारला बजावलेल्‍या नोटीसमध्‍ये नमूद केले आहे की, “सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञान (नियमन) अधिनियम, 2021 नुसार, एआरटी सेवा अंतर्गत जाणाऱ्या महिलेसाठी निर्धारित केलेली वयोमर्यादा 21-50 वर्षे आहे.” सिद्धू मुसेवाला याच्‍या आईचे वय ५८ वर्ष आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍यावर झालेल्‍या उपचाराचा अहवाल सादर करावा, असा आदेश  केंद्रीय आरोग्‍य आणि कुटुंब कल्‍याण मंत्रालयाने दिला आहे.

सिद्धू मुसेवाला याची ५८ वर्षीय आई चरणजित कौर यांनी रविवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बंठिडातील एक खासगी रुग्णालयात बाळाला (मुलगा) जन्म दिला. मुसेवाला याचे वडील बलकौर सिद्धू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देत बाळाचा फोटोही शेअर केला होता. वाहेगुरूच्या आशीवार्दाने सर्व काही शुभ घडले आहे. शुभचिंतकांचे मी आभार मानतो, असे बलकौर सिद्धू यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. आई होण्यासाठी चरणजित कौर यांनी आयव्हीएफ तंत्राची मदत घेतली होती.

पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात मे २०२२ मध्‍ये सिद्धू मूसेवाला याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ही हत्या लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डी बराड टोळीचे केल्याचे नंतर उघडकीस आले होते. या प्रकरणातील मुख्‍य आरोपी गँगस्‍टर सचिन बिश्‍नोई याला अजरबैजान येथे अटक करण्‍यात आली होती. बिश्‍नोई हा लाँरेंस गँगला बाहेरुन आदेश देत असल्‍याचे पोलिस चौकशीत स्‍पष्‍ट झाले होते. मुसेवाला हत्‍या प्रकरणी पोलिसांना १ हजार ८५० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. यामध्‍ये एकुण २४ आरोपी असून यातील २० जणांना अटक करण्‍यात आली आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button