Nashik Crime News | शस्त्राचा धाक दाखवून व्यावसायिकाचे अपहरण… त्यानंतर | पुढारी

Nashik Crime News | शस्त्राचा धाक दाखवून व्यावसायिकाचे अपहरण... त्यानंतर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शस्त्राचा धाक दाखवून चौघांनी फॅब्रिकेशन व्यावसायिकाचे अपहरण केले. त्यानंतर चौघांनी त्या व्यावसायिकाला मध्य प्रदेश येथे नेत १२ लाख ३० हजार रुपयांची खंडणी उकळल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात राजेश कुमार गुप्ता (३९, रा. उपेंद्रनगर, सिडको) यांनी चौघांविराेधात अपहरण, खंडणीची फिर्याद दाखल केली आहे.

गुप्ता यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी खिडकीच्या ग्रिलचे काम करायचे असल्याचे सांगून गुप्ता यांना सोमवारी (दि. ४) दुपारी 3 च्या सुमारास गंगापूर रोडलगतच्या शहीद अरुण चित्ते पुलाजवळ बोलावले होते. त्यानुसार गुप्ता तेथे गेल्यानंतर संशयितांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून कारमध्ये बळजबरीने बसवले होते. अपहरणकर्त्यांनी गुप्ता यांना त्यांच्या मध्य प्रदेश येथील देवास या मूळगावी नेले. तेथे अपहरणकर्त्यांनी गुप्ता यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यानुसार गुप्ता यांच्याकडून अपहरणकर्त्यांनी एटीएममधून ३० हजार रुपये व रोख स्वरूपात १२ लाख रुपये घेतल्याचे उघड झाले. पैसे मिळाल्यानंतर संशयितांनी गुप्ता यांना बसस्थानकावर सोडून पळ काढला. नाशिकला परतल्यानंतर गुप्ता यांनी म्हसरूळ पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शहर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके मागावर आहेत. अपहरणकर्त्यांनी गुप्ता यांच्या पत्नीकडून खंडणी घेतली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून अपहरणकर्त्यांची माहिती घेतली जात आहे.- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा.

हेही वाचा:

Back to top button