Mahashivratri 2024 : 'बमबम भोले'च्या गजराने त्र्यंबकनगरी दुमदुमली, महाशिवरात्रीला पहाटे पासून भाविकांची मांदियाळी | पुढारी

Mahashivratri 2024 : 'बमबम भोले'च्या गजराने त्र्यंबकनगरी दुमदुमली, महाशिवरात्रीला पहाटे पासून भाविकांची मांदियाळी

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा- महाशिवरात्रीचा पर्वकाल साधण्यासाठी हजारो शिवभक्तांनी त्र्यंबकेश्वर येथे गर्दी केली होती. त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी पहाटे चारपासून भक्तांनी रांगा लावल्या होत्या. गुरवारी रात्री पासूनच गर्दीत वाढ झाल्याने त्र्यंबक नगरी बमबम भोलेच्या जयघोषाने दुमदुमली होती. ञ्यंबकेश्वर मंदिर पुर्व दरवाजा दर्शन रांगेत सहा तासांपेक्षा जास्तवेळ लागत होता. तर पेड दर्शनासाठी देखील काही तासांची प्रतीक्षा करावी लागत होती. (Mahashivratri 2024)

त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या त्रिकाल पूजा वेळेत झाल्या. दुपारी ३ ते ५ दरम्यान प्रदोष पुष्प पूजक आराधी यांनी नित्य प्रदोष पूजा केली. त्यानंतर सायंकाळी ट्रस्टची लघुरुद्र पूजा करण्यात आली. महाशिवरात्रीस व्हीआयपी दर्श बंद असल्याचे पत्र देवस्थान ट्रस्टने जिल्हाधिकारी यांना दिले होते. मात्र, तरी देखील काही व्हीआयापी दर्शनासाठी आलेले दिसून येत होते. गर्भगृह दर्शनाचा लाभ देखील सकाळच्या वेळेत काही भक्तांना मिळाला. (Mahashivratri 2024)

ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी आणि प्रदक्षिणेला भाविकांची गर्दी झाली होती. पहाटेपासून भाविक रवाना झाले होते. शहरातील सर्वच शिव मंदिरांमध्ये गर्दी होती. जुना महादेव, मुकुंदेश्वर, इंद्राळेश्वर, ऋणमुक्तेश्वर, केदारेश्वर तसेच जुना आखाडा निलपर्वत येथील निलकंठेश्वर, लग्नस्तंभ या ठिकाणी भाविकांची बेलपत्र कवठाचे फळ वाहण्यासाठी भक्तांची गर्दी केली होती. शहरात दिवसभर शिव भजनांचा गजर सुरू होता. नाशिक- त्र्यंबक प्रवासासाठी महामंडळाची दर अर्ध्यातासाला बस सोडली होती. त्याचरोबरच सिटीलींकच्या जादा बस देखील सोडण्यात आल्या होत्या. 

रावसाहेब दानवेकडून पहाटेच दर्शन

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी त्र्यंबक येथे पहाटेच हजेरी लावत ३ वाजून ४५ मिनिटांनी मंदिरात हजेरी लावत त्र्यंबकरायाला अभिषेक पूजा केली. यावेळी अन्नदाना शेतकरी राजाच्या समृद्धी मागीतल्याची प्रतिक्रीया त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कुशावर्तावर त्र्यंबकरायाचे स्नान (Mahashivratri 2024)

दुपारी तीनच्या सुमारास ञ्यंबकराजाची पालखी निघाली. पालखी पाचआळी भागातून पुर्वसंस्थानीक जोगळेकर वाड्यावरून कुशावर्तावर स्नानासाठी आली. पालखीस विलास मोरे व नंदकुमार मोरे यांचे मंगलवाद्य पथक लक्षवेधुन घेत होते. पालखी सोबत पुजारी, शागीर्द, सर्व विश्वस्त, मानकरी, ग्रामस्थ यासह भक्तांची उपस्थिती होती.

हेही वाचा :

Back to top button