नाशिकचे ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजरांविरोधात आडगावला गुन्हा दाखल | पुढारी

नाशिकचे ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजरांविरोधात आडगावला गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत पार्टी केल्याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट एकने बडगुजर यांची काही दिवस चौकशी केल्यानंतर सलीम कुत्तासोबत झालेल्या पार्टीत बडगुजर हजर असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्याविरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल झाल्याने बडगुजर यांचे पाय खोलात गेले आहेत. हिवाळी अधिवेशनात भाजप आ. नितेश राणे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता (Salim Kutta) आणि ठाकरे गटाचे बडगुजर यांचा नाशिकमध्ये झालेल्या पार्टीतील नाचतानाचा व्हिडिओ दाखविला. दहशतवाद्यासोबत बडगुजर नाचत असल्याने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी आ. राणे यांनी केली होती. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार, नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या डिसेंबर महिन्यात बडगुजर यांच्यासह पार्टीत सहभागी असणाऱ्यांची शहर गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली होती. चौकशीचा अहवाल पोलिस आयुक्तांना मिळाला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यामध्ये बेकायदेशीर कृत्य केल्याचा ठपका ठेवत बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुप्तता पाळल्याचे दिसून आले. या गुन्ह्यासंदर्भात पोलिसांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्याची चौकशी केलेले तत्कालीन पोलिस निरीक्षक विजय ढमाळ हे मंगळवारी (दि. २७) रात्री आडगाव पोलिस ठाण्यात आल्याचे समजते. बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने उबाठा गटाला धक्का मानला जात आहे.

पार्टीचे गूढ कायम
सन २०१२ ते २०१६ या कालावधीत सलीम कुत्ता नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात होता. त्याच कालावधीत एका राजकीय आंदोलनामुळे मध्यवर्ती कारागृहात असताना सलीम कुत्ता सोबत ओळख झाल्याचा दावा बडगुजर यांनी केला होता. पोलिसांच्या चौकशीनुसार, बडगुजर यांच्या नातलगाच्या नावे आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फार्म हाउसवर २४ मे २०१६ रोजी रात्री पार्टी रंगली होती. ही पार्टी सलीम कुत्तासाठी आयोजित केल्याचे समजते. पार्टीत बडगुजरांच्या कार्यकर्त्यांसह इतर लोक सहभागी होते. या प्रकरणात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याचीही चौकशी झाली होती. दरम्यान, सलीम कुत्ता यास २५ एप्रिल ते २५ मे २०१६ असा महिनाभर पॅरोल मंजूर झाला. २४ मेला रात्री पार्टी करून तो मध्यवर्ती कारागृहात हजर झाला. तेव्हापासून तो कारागृहातच असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Salim Kutta : सलीम कुत्ता कोण आहे? त्याला कुत्ता नाव कसे मिळाले?
मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्यासाठी दाऊदने दुबईत जानेवारी १९९३ मध्ये बैठक घेतली होती. त्यात सलीम कुत्ता सामील होता.

सलीम कुत्ता याचे मूळ नाव काय, त्याला सलीम कुत्ता हे नाव कसं पडलं (Who is Salim Kutta?)
मुंबईमध्ये १९९३ मध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्या बॉम्बस्फोटाचा प्रमुख गुन्हेगार दाऊद इब्राहिम याचा सलीम कुत्ता साथीदार होता. तो मूळचा उत्तर प्रदेशमधील नजीबाबादच्या कल्हेडी गावातला. त्याचे मूळ नाव मोहम्मद सलीम शेख आहे. मात्र, तो कुत्र्यासारखा गुरगुरायचा म्हणून गुन्हेगारी जगात त्याला सलीम कुत्ता हे नाव पडले.

हेही वाचा:

Back to top button