50 किलो चांदीचे सिंहासन लंपास | पुढारी

50 किलो चांदीचे सिंहासन लंपास

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात सोमवारी (दि.12) रात्री साडेबारा वाजता चोरट्यांनी 50 किलो वजनाचे अंदाजे 30 लाख रुपये किंमतीचे चांदीचे सिंहासन चोरुन नेले. या घटनेने पारगावमध्ये कडकडीत बंद पाळत या चोरीचा छडा लावण्याची मागणी केली.पारगाव सुद्रिकचे ग्रामदैवत सुद्रिकेश्वर महाराज मंदिराचा सोमवारी (दि.12) रोजी रात्री साडेबारा वाजता चोरट्यांनी मुख्य दरवाजा कटावणीने तोडून मंदिरात प्रवेश केला. मंदिराच्या गाभार्‍यातील सुद्रिकेश्वर महाराजांचे 50 किलो वजनाचे 30 लाख रुपयांचे चांदीचे सिंहासन चोरून नेले. या घटनेचे चित्रीकरण मंदिरात असलेल्या सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे.

घटनेची माहिती पहाटे साडेपाच वाजता श्रीगोंदा येथील प्रसिद्ध व्यापारी कुटुंबासह दर्शनासाठी आले असता, त्यांना मंदिराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी मंदिराचे पुजारी प्रवीण रमेश धुमाळ यांना घडलेल्या घटनेची माहिती फोनवरून दिली.घटनेची माहिती श्रीगोंदा पोलिसांना देत गावकर्‍यांना जमा केले.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले आणि पोलिस कर्मचार्‍यांनी मंदिरात धाव घेत पाहणी केली. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपासासाठी श्वान पथक, अंगुली मुद्रा तज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, बेलवंडीचे पोलिस निरीक्षक संतोष भंडारे, पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग यांनी भेट देत सीसीटीव्ही तपासात तांत्रिक माहिती संकलन करीत तपास सुरू केला. आरोपी लवकरच जेरबंद होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Back to top button