Nashik I अयोध्या सोहळ्यानिमित्त सजली त्र्यंबकनगरी | पुढारी

Nashik I अयोध्या सोहळ्यानिमित्त सजली त्र्यंबकनगरी

त्र्यंबकेश्र्वर: पुढारी वृत्तसेवा

अयोध्येतील मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, ४० कारसेवकांचा सत्कार केला जाणार आहे. शहरातील विविध मंदिरांतर्फे रामभजन आणि प्रसाद वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

पुराणकालात प्रभू श्रीरामचंद्र त्र्यंबकेश्वर येथे आले होते. त्यांनी पिता दशरथराजाचे पिंडदान येथे केले असे पौराणिक महात्म्य या शहराला आहे. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने ञ्यंबकेश्वर येथे आनंदोत्सव साजरा होत आहे. त्र्यंबकनगरीत पाचआळी येथील श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. याबाबत अध्यक्ष संकेत टोके यांनी माहिती दिली. येथे भव्य मंडप व विद्युत रोषणाई करण्यात येत आहे.

येत्या 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता अभिषेक पूजनाने प्रारंभ होईल. त्यानंतर सकाळी 10 वाजता रामजन्मभूमी संघर्षवीर ४० कारसेवकांचा गौरव करण्यात येणार आहे. याचवेळेस मोठया डिजिटल पडद्यावर राममंदिर कारसेवकांचा संघर्ष प्रक्षेपित करण्यात येणार आहे. दुपारी १२ ला अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. दरम्यान श्रीरामाची महाआरती, महिलांचे रामभजन, गायक संजय कुलकर्णी यांच्या रामगीतांचा कार्यक्रम, सायंकाळी दीपोत्सव व महाआरती असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे. ञ्यंबकेश्वर मंदिर व प्रांगणात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भक्तांना प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. मंदिर प्रांगणात रामरक्षा पठण, रामायणावर आधारित गीतसंगीत तसेच दीपोत्सव करण्यात येणार आहे. तीर्थराज कुशावर्तावर गंगापुत्र ट्रस्ट यांच्याकडून विद्युत रोषणाई, दीपोत्सव, महाआरती आयोजित करण्यात आली आहे.

मेनरोड ञ्यंबकेश्वरचा राजा मित्रमंडळाच्या गंगेच्या बाजूने कुशावर्त चौक ते लक्ष्मीनारायण चौक दरम्यान विद्युत रोषणाई केली आहे. तेथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात येणार आहे. यादरम्यान 5 हजार 500 पेढेवाटप व फटाक्यांची आताषबाजीचे नियोजन संस्थापक अध्यक्ष कुणाल उगले यांनी केले आहे.

हेही वाचा:

Back to top button