‘निपाह’ लसीची पहिली मानवी चाचणी ऑक्सफर्डमध्ये | पुढारी

'निपाह' लसीची पहिली मानवी चाचणी ऑक्सफर्डमध्ये

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतातील केरळ राज्‍यासह आशियातील काही देशांमध्‍ये धुमाकूळ घालणार्‍या निपाह विषाणू( Nipah virus ) विरूद्ध  संभाव्य लसीसाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात मानवी चाचणी (Human testing) सुरू झाली आहे, असे वृत्त ‘रॉयटर्स’ने दिले आहे. आस्ट्राझेनेका फार्मा आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीच्‍या कोरोना लसासाठी वापरल्‍या गेलेल्‍या तंत्रज्ञानावर आधारितच ही लस आहे. (Human testing of first Nipah virus vaccine begins)

निपाह विषाणूची लागल झालेला पहिला रुग्‍ण २५ वर्षांपूर्वी सर्वप्रथम मलेशियामध्‍ये आढळला होता. यानंतर बांगलादेश, भारत आणि सिंगापूरमध्ये त्याचा उद्रेक झाला. आता या विषाणूविरूद्ध मानवी लसीसाठीच्‍या चाचणीत १८ ते ५५ वयोगटातील ५२ जण सहभागी झाले आहेत, असे विद्यापीठाच्या महामारी विज्ञान संस्थेच्या प्रवक्त्याने सांगितले.

निपाह विषाणूमध्‍ये महामारीची क्षमता आहे. आम्‍ही घेत असलेल्‍या लसीची चचाणी ही या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी साधनांचा संच तयार करण्याच्या प्रयत्नांमध्ये एक पाऊल पुढे आहे, असे डॉ इन-क्यू यून यांनी सांगितले. केंब्रिज येथील फार्मास्युटिकल आणि बायोटेक्नॉलॉजी कंपनी मॉर्डनाने २०२२ मध्‍ये यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲलर्जीच्‍या सहकार्याने निपाह विषाणू लसीची चाचणी देखील सुरू केली होती.

मागील वर्षी केरळमध्‍ये आढळले होते निपाह रुग्‍ण

केरळ राज्‍यात सप्‍टेंबर २०२३मध्‍ये निपाहचे रुग्‍ण आढळल्‍याने खळबळ उडाली होती. सहा रुग्‍ण आढळले यातील दोघांचा उपाचारावेळी मृत्‍यू झाला होता.

निपाहचा संसर्ग आहे धोकादायक

निपाहचा संसर्ग झालेल्‍या व्‍यक्‍तीला ताप, डोकेदुखी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तसच मेंदूला सूज येण्याची शक्यता असते. जागतिक आरोग्‍य संघटनेच्‍या (WHO) माहितीनुसारनिपाह संसर्ग झालेल्‍या रुग्‍णाला ४० ते ७५ टक्‍के मृत्‍यूचा धोका असतो.

विषाणूला ‘निपाह’ नाव कसे दिले गेले?

जागतिक आरोग्‍यसंघटनेच्‍या (WHO) मते, निपाह विषाणू हा एक झुनोटिक विषाणू आहे, म्हणजे तो प्राणी आणि लोकांमध्ये पसरू शकतो. हा हवेतून पसरणारा संसर्ग नाही. मात्र दूषित अन्नाद्वारे किंवा थेट व्यक्ती-व्यक्तीद्वारे संक्रमित होऊ शकतो. निपाह विषाणू डुकरांना आणि माणसांमध्ये आजार निर्माण करण्यासाठी देखील ओळखला जातो. या विषाणूचे नाव निपाह हे मलेशियातील गावातून घेतले गेले आहे. येथे या विषाणूमुळे पहिला रुग्‍ण बळी गेला होता.

हेही वाचा :

 

Back to top button