दिलासादायक ! JN1 चा संसर्ग सौम्य | पुढारी

दिलासादायक ! JN1 चा संसर्ग सौम्य

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कोरोना विषाणूच्या जेएन.1 या नव्या व्हेरियंटमुळे महिनाभरात देशात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. मात्र, विषाणूचा संसर्ग सौम्य स्वरूपाचा असल्याचा निष्कर्ष बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात नुकत्याच केलेल्या संशोधन अहवालातून काढला आहे. यासाठी दोन आठवड्यांत राज्यात आढळलेल्या जेएन.1 च्या 112 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. राज्यस्तरीय टास्क फोर्सचे सदस्य आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्यासह डॉ. रश्मिता दास, डॉ. सोनाली दुधाते, डॉ. मानसी राजमाने, डॉ. सफनाह निझारुद्दीन या टीमने तयार केलेले संशोधन अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

जेएन.1 चा प्रसार 88 टक्के झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. व्हेरियंटमध्ये म्युटेशन झाले असले तरी धोका कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. डॉ. राजेश कार्यकर्ते म्हणाले, रुग्णांचे वय, लिंग, निवासस्थान, संपर्क क्रमांक, नमुना संकलनाची आणि परीक्षणाची तारीख आदी माहिती राज्य शासनाकडून संकलित करण्यात आली. रुग्णांच्या वैद्यकीय पार्श्वभूमीची नोंद करून घेण्यात आली आणि रुग्णांशी फोनवरून संवाद साधण्यात आला. यातून लक्षणे, संसर्गाचा कालावधी, क्वारंटाइनचा कालावधी, उपचार, लसीकरणाची स्थिती आदी माहितीही जाणून घेतली.अभ्यासामध्ये पुरुष अणि महिला रुग्णांचा समान संख्येमध्ये समावेश केला होता.

यामध्ये 85 टक्के संसर्ग 21 ते 30 वर्षे वयोगट आणि 60 वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठांमध्ये झाल्याचे स्पष्ट झाले. एकूण 112 रुग्णांपैकी केवळ 10 रुग्णांना रुग्णालयात दाखल केले होते. इतर रुग्णांनी गृहविलगीकरणात उपचार घेतले. रुग्णालयात दाखल झालेल्या 10 पैकी 6 जणांना ऑक्सिजन लावण्यात आला, तर एका रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज भासली. सर्व 112 रुग्णांनी लसींचे दोन्ही डोस घेतले होते.

हेही वाचा :

Back to top button