रायगड : डॉल्फिनच्या संचारामुळे समुद्र पर्यटनाला बहर | पुढारी

रायगड : डॉल्फिनच्या संचारामुळे समुद्र पर्यटनाला बहर

जयंत धुळप

रायगड : सिंधुदुर्गात निवती, रत्नागिरीत भाट्ये आणि रायगडमध्ये श्रीवर्धन या किनार्‍यांवर डॉल्फिन सफरीचा नवा आनंद पर्यटक घेत आहेत. गेल्या दोन वर्षांत 25 हजार पर्यटकांनी डॉल्फिन सफर केल्याचे दिसून येत आहे. मांडवा-गेट वे प्रवासातही अनेकदा पर्यटकांना डॉल्फिन दर्शन होते. किमान दोन ते चार अशा संख्येने हे डॉल्फिन पाण्याबाहेर येताना आढळतात. एका बाजूला स्नॉर्कलिन-पाण्याखालचे जग आणि दुसर्‍या बाजूला डॉल्फिन सफर, यामुळे सागरी पर्यटन बहरले आहे.

डॉल्फिनला पाहण्यासाठी पर्यटक आगाऊ बोटी बूक करून आनंद घेतात. रायगड जिल्ह्यात डॉल्फिन सफरीसाठी स्पीड बोटीचा पर्याय उपलब्ध आहे. 10 ते 12 पर्यटकांना 5 ते 6 हजारांमध्ये डॉल्फिन सफर घडवून आणली जाते. यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांच्या सागरी किनारपट्टीत यंदादेखील डॉल्फिनचे दर्शन होऊ लागले असून, त्यांच्या विविध जलक्रीडा पाहण्याकरिता पर्यटक कोकणात येऊ लागले आहेत. पालघर जिल्ह्यातील केळवे, माहीम, रायगड जिल्ह्यातील उरण, अलिबाग, मुरूड, दिघी, श्रीवर्धन, रत्नागिरी जिल्ह्यात हर्णे, दापोली, गणपतीपुळे, मिरकरवाडा, तर सिंधुदूर्ग जिल्ह्यात निवती, देवबाग, मालवण, मिठबांव, वेंगुर्ले, देवगड या किनार्‍यांवर हे डॉल्फिन दिसून येत असल्याने पर्यटकांचे पाय या किनार्‍यांकडे वळताना दिसून येतात. डॉल्फिनबद्दल सर्वांनाच कुतूहल आहे.

शास्त्रज्ञही डॉल्फिनच्या प्रेमात

डेहराडून येथे असलेल्या वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनंत पांडे यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांचा चमू गेल्या दोन वर्षांपासून रत्नागिरी व सिंधुुदुर्ग जिल्ह्यांच्या किनारपट्टीत येणार्‍या डॉल्फिन आणि व्हेल या दोन वैशिष्ट्यपूर्ण सागरी जलचरांचा अभ्यास करत असल्याची माहिती रत्नागिरी येथील राज्यातील एकमेव शासकीय मत्स्य महाविद्यालयाच्या सागरी जीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी दिली आहे.

कोकण किनारपट्टीत गेल्या काही वर्षांपासून सागरी प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने डॉल्फिनची संख्या कमी दिसून येत होती. परंतु, गेल्यावर्षीपासून पुन्हा डॉल्फिन दिसून येऊ लागले आहेत, हे सुचिन्ह मानले जात आहे. त्यांचे येथील अस्तित्व हे येथील समुद्रातील प्रदूषण कमी झाल्याचे निदर्शक मानले जात आहे. हिवाळ्याच्या दिवसांत कोकणच्या किनारी भागात कोळंबी, तारली व अन्य छोटे मासे यांचे प्रमाण वाढत असते आणि हेच डॉल्फिनचे प्रमुख खाद्य असल्याने हे डॉल्फिन किनारी भागात दिसून येतात. दरम्यान, कोळंबी, तारली व अन्य छोटे मासे एका किनार्‍यावरून दुसर्‍या किनार्‍यांकडे स्थलांतर करतात, त्यांच्यापाठोपाठ डॉल्फिनदेखील एका किनार्‍याकडून दुसर्‍या किनार्‍यावर जातात. परिणामी, आज जेथे डॉल्फिन जेथे दिसले तेथेच ते चार दिवसांनी दिसतील असे सांगता येत नाही, असे डॉल्फिनच्या अस्तित्वाबद्दल निरीक्षण डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी नोंदवले.

डॉल्फिन संवर्धन प्रयत्नांना येतेय यश

गेल्या दोन वर्षांपासून कोकणच्या किनारपट्टीत डॉल्फिन संरक्षण आणि संवर्धन यासाठीदेखील हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे आता डॉल्फिनच्या संख्येतदेखील वाढ दिसून येत आहे. जनजागृतीमुळे मच्छीमार आपल्या बोटी डॉल्फिन असलेल्या क्षेत्रातून घेऊन जात नाहीत. त्याचबरोबर डॉल्फिनचे अस्तित्व असलेल्या क्षेत्रात मासेमारी जाळी टाकत नाहीत. यामुळे डॉल्फिन जखमी होणे आणि मृत होणे यांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. यंदाच्या हंगामात अद्याप एकही डॉल्फिन कोकण किनारपट्टीत जखमी वा मृतावस्थेत आढळलेला नसल्याचे डॉ. मोहिते यांनी सांगितले.

Back to top button