छगन भुजबळांना येवल्यात दाखवले काळे झेंडे | पुढारी

छगन भुजबळांना येवल्यात दाखवले काळे झेंडे

नाशिक ; पुढारी ऑनलानइन डेस्क ; नाशिकहुन येवल्याला जाताना छगन भुजबळ यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. छगन भुजबळांना मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध नोंदवला.

येवल्यातील भरवस फाटा येथे भुजबळांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणावरुन मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटलेला आहे. छगन भुजबळ व जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून मराठा बांधवांनी भुजबळांना पुन्हा एकदा विरोध दर्शवला आहे.

याआधीही छगन भुजबळ येवला तालुका नुकसान पाहणी दौऱ्यावर गेले होते, त्यावेळेलाही भुजबळांना आपल्याच मतदारसंघातून मोठा विरोध झाला होता.  मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी रास्तारोको करुन भुजबळ गो बॅक च्या घोषणा दिल्या होत्या. येवला तालुक्यातील सोमठाणे गावात तर भुजबळांचा ताफा ज्या मार्गाने गेला त्या मार्गावर गोमूत्र शिंपडून रस्ता पवित्र करण्यात आला होता. मराठा आंदोलकांचा रोष अजूनही कमी झालेला नसून आज (दि. 25) नाशिकहुन येवल्याला जात असताना त्यांना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले.

दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्येही भुजबळांना काळ्या झेंड्यांचा सामना करावा लागला होता. तपोवन येथे आयोजित  निष्काम कर्मयोगी सोहळ्यात छगन भुजबळ यांनी हजेरी लावली होती. यावेळी या ठिकाणी जमलेल्या काही भक्तांकडून छगन भुजबळ यांचा निषेध करण्यात आला होता.

हेही वाचा :

Back to top button