Crime News : दहशत माजविण्यासाठी घरांची तोडफोड | पुढारी

Crime News : दहशत माजविण्यासाठी घरांची तोडफोड

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  रिहे येथील मोरेवाडी पडाळ आणि खेंगरेवाडी येथे दहशत माजविण्यासाठी मंगेश नामदेव पालवे आणि त्याच्या काही साथीदारांनी कुर्‍हाड व कोयत्याने पाच ते सहा घरांची तोडफोड केली. यात तीन चारचाकी व दोन दुचाकी गाड्यांचेही नुकसान केले आहे. शनिवारी (दि. 23) रात्री मोरेवाडी, पडाळ आणि खेंगरेवाडी येथे मंगेश पालवे व त्याच्या काही साथीदारांनी दारू पिऊन कुर्‍हाड आणि कोयत्याने दिसेल त्या घराचे दरवाजे तोडले. तसेच घरात नुकतेच भरूडने विणलेल्या तांदळाची पोतीही फोडली. घरात दिसेल त्या वस्तूची तोडफोड केली. मंगेश पालवेवर पौड पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून, त्याच्या दहशतीपुढे ग्रामस्थ हतबल झाले आहेत. मात्र, रविवारी (दि. 24) पहाटे नागरिकांनी पौड पोलिस ठाणे येथे येऊन पोलिसांना घटनेचे गांभीर्य सांगितले.

संबंधित बातम्या :

पहाटे चार ते सकाळी दहापर्यंत पोलिस परिसरात मंगेश पालवेचा शोध घेत होते. अखेर मंगेश पालवे आणि त्याचा साथीदार अथर्व मोरे यांना अटक करण्यात आली. यामध्ये अनेक पुरुष आणि महिलांना पालवे याने दहशत माजविण्यासाठी मारहाण केली आहे. पालवे शाळेत जाणार्‍या मुलांनाही मारहाण करतो तसेच गावात येणार्‍या फेरीवाल्यांनाही मारहाण करतो. त्याच्या दहशतीमुळे आम्ही गाव सोडून जाण्याच्या तयारीत आहोत, असे येथील नागरिकांनी सांगितले. या सर्व नागरिकांनी रविवार दुपारी पौड पोलिस ठाण्यात येऊन पालवेवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केलेली आहे. त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.

पोलिसांवर कुत्रे सोडण्याचा प्रयत्न
पोलिस मंगेश पालवे याला अटक करण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांच्या अंगावर कुत्रे सोडण्याचा प्रयत्न केला. सहा तासाच्या प्रयत्नानंतर पालवेला अटक करण्यात आली. पालवेला पोलिस उपनिरीक्षक सुरेश गिते आणि त्यांच्या पथकाने अटक केली. पालवेवर गुन्ह्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, त्याच्यावर मोक्कातंर्गतही कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यातूनही तो सुटला.

Back to top button