हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून; नागपुरात प्रशासन जोमाने तयारीला | पुढारी

हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून; नागपुरात प्रशासन जोमाने तयारीला

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार असून ते 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या कामकाजावर बुधवारी मुंबईत विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. यासोबतच नागपुरात प्रशासन अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी जोमाने कामाला लागले.

1 व 2 डिसेंबरला नागपुरात महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत आहेत. एकंदरीत व्हीव्हीआयपी मुव्हमेंटच्या निमित्ताने पोलिस यंत्रणाही अलर्ट मोडवर आहे. विधान परिषद उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी मंगळवारी नागपुरातील विधानभवनात आढावा बैठक घेतली. अधिवेशनाबाबतची अनिश्चितता असली तरी उद्याच ते स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले होते. बुधवारी विधानभवनात आयोजित बैठकीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदी उपस्थित होते.

पूर्वनियोजित तारखेनुसार 7 डिसेंबर रोजीच अधिवेशन सुरू होणार असल्याचे अखेर निश्चित झाले. सध्यातरी अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत चालणार असल्याचे संकेत आहेत. मात्र, अधिवेशनाच्या दरम्यान 19 डिसेंबर रोजी होणार्‍या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत त्यावर अंतिम निर्णय होईल, असे सांगण्यात आले.

विरोधी पक्षनेते नाराज…

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अधिवेशनाच्या अल्प कालावधीवर नाराजी व्यक्त केली. सध्याच्या नियोजनानुसार कामकाज दिवस केवळ 10 दिवसांचे होणार आहे. आम्ही किमान तीन आठवडे तरी नागपुरात अधिवेशन चालावे, अशी मागणी केली होती. महाराष्ट्रात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. आम्हाला चर्चा करायची होती. शेतकरी संकटात आहे, बेरोजगारी, रुग्णालये आदींचे प्रश्न आहेत. राज्यात अनागोंदी कारभार सुरू आहे. अनेक मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर चर्चा करायची होती; पण सरकारने पळ काढला, असे वडेट्टीवार म्हणाले.

Back to top button