ASEAN India Summit : 21 वे शतक आशियाचे : पंतप्रधान | पुढारी

ASEAN India Summit : 21 वे शतक आशियाचे : पंतप्रधान

जकार्ता, वृत्तसंस्था : 21 वे शतक हे आशिया खंडाचे शतक आहे. हे आपले शतक आहे. त्यासाठी कोव्हिडोत्तर काळातील जगाची नव्याने मांडणी करण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. जकार्ता येथे ‘आसिआन’ राष्ट्रांच्या शिखर परिषदेत बोलताना मोदी यांनी ‘आसिआन’ देश हे जगाच्या विकासाचे केंद्र आहे. भारताच्या इंडो पॅसिफिक क्षेत्राबाबतच्या धोरणात ‘आसिआन’ देशांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.(ASEAN India Summit)

ASEAN India Summit :‘आसिआन’ जागतिक विकासाचा केंद्रबिंदू

इंडोनेशियाची राजधानी जकार्तात सुरू असलेल्या ‘आसिआन’ शिखर परिषदेत गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले. ते म्हणाले की, कोव्हिडोत्तर काळात नव्या जगाची मांडणी करावी लागणार आहे. त्यात ग्लोबल साऊथ आणि ‘आसिआन’ देशांचे स्थान महत्त्वाचे. दहा देशांची संघटना असणारा ‘आसिआन’ समूह हा जागतिक विकासाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्यामुळे 21 वे शतक आशिया खंडाचे असणार आहे.पंतप्रधान म्हणाले की, ‘आसिआन’ या क्षेत्रातील अत्यंत प्रभावशाली गट असून, भारतासह अमेरिका, चीन, जपान आणि ऑस्ट्रेलिया यासारखे अनेक देश संवादाच्या स्तरावर ‘आसिआन’चे भागीदार आहेत. मुक्त आणि खुल्या इंडो पॅसिफिक क्षेत्राची प्रगती आणि ग्लोबल साऊथच्या देशांचा आवाज ही आपल्या सर्वांची प्राथमिकता आहे. पंतप्रधान म्हणाले की, ‘आसिआन’ भारताच्या पूर्वेकडील देशांबाबतच्या धोरणाचा गाभा आहे. ‘आसिआन’ आणि भारत यांना इतिहास आणि भूगोल जोडतो. समान मूल्ये, क्षेत्रीय एकता, शांतता आणि भरभराट हे घटक आपणा सर्वांना जोडणारे आहेत, असेही ते म्हणाले.

हे आहेत ‘आसिआन’चे सदस्य देश

दक्षिण पूर्व आशियाई देशांची प्रभावशाली संघटना असलेल्या ‘आसिआन’मध्ये आर्थिकद़ृष्ट्या प्रगतीच्या दिशेने निघालेल्या देशांचा समावेश आहे. त्यात ब्रुनेई, इंडोनेशिया, कंबोडिया, व्हिएतनाम, मलेशिया, फिलिपाईन्स, थायलंड, सिंगापूर, म्यानमार आणि लाओस या दहा देशांचा समावेश आहे.

हेही वाचा 

Back to top button