गोव्यातील आमदारांसह मंत्र्यांच्या वेतनात वाढ; आता घर, वाहन आणि अधिवेशन भत्त्यासाठी मिळणार ‘एवढी’ रक्कम | पुढारी

गोव्यातील आमदारांसह मंत्र्यांच्या वेतनात वाढ; आता घर, वाहन आणि अधिवेशन भत्त्यासाठी मिळणार 'एवढी' रक्कम

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्यातील सर्व आमदार आणि मंत्र्यांना वाढीव वेतन आणि पेन्शन लागू करण्यासंबंधीची अधिसूचना आज (दि. ७) जारी झाली आहे. या योजनेमुळे आता सुमारे १९ कोटी रुपयांचा बोजा गोमंतकीय जनतेवर पडणार आहे. गेल्या पावसाळी अधिवेशनात या वेतन वाढीचा निर्णय घेण्यात आला होता. आमदार वेतन भत्ता आणि पेन्शन कायदा २००४ मध्ये दुरुस्ती करण्यासाठी मांडलेल्या दुरुस्ती विधेयकाला सर्व आमदारांनी बिनविरोध समर्थन दिले होते.

आता आमदारांना विधानसभा अधिवेशनाच्या काळात प्रतिदिन चार हजार रुपये भत्ता मिळणार आहे यापूर्वी तो ३ हजार रुपये होता. नवीन वाहन खरेदीसाठी यापूर्वी फक्त पंधरा लाख रुपये दिले जात होते, वाहनाच्या किमती भरमसाठ वाढल्याने आता चाळीस लाख रुपये दिले जाणार आहेत. गृह खरेदीसाठी तीस लाखाएवजी चाळीस लाख मंजूर करण्यात आले आहेत.

प्रवास भत्ता आणि आर्थिक मदत

गोव्या बाहेर प्रवास केल्यास निवासासाठी यापूर्वी साडेसात हजार रुपये दिले जात होते. आता त्याच्यात वाढ करून प्रतिदिन बारा हजार रुपये भत्ता दिला जाणार आहे. वैद्यकीय उपचारसाठी आर्थिक मदतीची मर्यादा तीन लाख रुपये पर्यंत होती ती वाढवून आता पाच लाख रुपये करण्यात आली आहे.

निवृत्तीवेतनात वाढ

आमदाराच्या निवृत्तीवेतनात आता वाढ करण्यात आली आहे. पहिल्या वर्षासाठी दरमहा वीस हजार तर दुसऱ्या वर्षापासून दरमहा तीस रुपये देण्यात येणार आहेत. यापूर्वी त्यांना पहिल्या वर्षासाठी दरमहा पंधरा हजार रुपये व त्यानंतर वीस हजार रुपये निवृत्ती वेतन दिले जात होते.

पाचशे रुपये लिटर पेट्रोलची बिले मंजूर

प्रवासासाठी आमदारांना प्रत्येक महिन्याला तीनशे लिटर पेट्रोल दिले जात होते, आता पाचशे रुपये लिटर पेट्रोलची बिले मंजूर केली जाणार आहेत. याव्यतिरिक्त आमदारांना आता स्वीय सचिव खासगी सहाय्यक दोन कारकून व एक वाहन चालक नियुक्त करता येतो  त्याचे वेतन देखील सरकार देणार आहे.

हेही वाचा

Back to top button