‘वंशावळी नसल्याने आम्हाला निर्णयाचा फायदा नाही, आंदोलन सुरूच राहणार’ | पुढारी

'वंशावळी नसल्याने आम्हाला निर्णयाचा फायदा नाही, आंदोलन सुरूच राहणार'

शहागड (जालना) – अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषणाच्या आठव्या दिवशी उपोषण चालू राहणार असल्याची माहिती दिली. मराठा समाजातील ज्या व्यक्तींची ‘कुणबी’ अशी निजामकालीन नोंद असेल, त्यांना इतर मागास प्रवर्गातील (कुणबी) दाखले दिले जातील, अशी घोषणा सरकारने केली होती. ज्यांच्याकडे वंशावळी असेल त्यांना गुरुवारपासून कुणबी प्रमाणापत्र देण्यात येईल. यासाठी जीआर काढण्यात येईल, असं सरकारनं सांगितलं आहे. सरकारच्या या निर्णयानंतरही मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका बदललेली नाही. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णयांनंतरही आपण आपले आंदोलन पुढे सुरू ठेवणार असल्याचे पाटील यांनी दिली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारी निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आज पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “सरकारी निर्णयाची प्रत अजून आलेली नाही. काल सरकारने एक निर्णय घेतला आहे. ज्यांच्याकडे कुणबी असल्याची नोंद आहे अशा मराठा बांधवांना आजपासून कुणबी जातप्रमाणपत्र मिळायला सुरुवात होणार आहे. मात्र मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे ही मूळ मागणी आहे.

सरकारने एक समिती नेमली आहे जी एक महिन्यात आपला अहवाल देईल. आजची परिस्थिती पाहता, मराठा समाजातील बांधवांना सरसकट प्रमाणपत्र देण्यात यावं, ही आमची मागणी आहे. सरकारने काढलेल्या अध्यादेशात ज्यांच्याकडे वंशावळीचे पुरावे आहेत, त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळेल, असे म्हटले आहे. या अध्यादेशात ‘वंशावळीचे पुरावे आहेत’ हे शब्द वगळून नवा अध्यादेश काढावा, तो निघेपर्यंत आम्ही वाट पाहू असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

आपण आपले आंदोलन यापुढेही चालूच ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले. आज वंशावळीचे दस्तावेज कोणाकडेच नाही, त्यामुळे आम्हाला फायदा नाही. जर वंशावळीचे पुरावे असतील तर आम्हीच तहसील कार्यालयात जाऊन अर्ज करून कुणबी जात प्रमाणपत्र मिळवू शकतो, त्यासाठी अध्यादेशाची गरज नाही असे पाटील यांनी म्हटले.

Back to top button