अजोय मेहता यांच्या मालकीच्या फ्लॅट आयकर विभागाने केला जप्त | पुढारी

अजोय मेहता यांच्या मालकीच्या फ्लॅट आयकर विभागाने केला जप्त

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि उच्चपदस्थ अधिकार्‍यांमागील केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा कायम असून, बेनामी मालमत्ता प्रकरणात राज्याचे माजी मुख्य सचिव आणि महारेराचे चेअरमन अजोय मेहता यांच्या मालकीच्या नरिमन पॉईंट येथील आलिशान सदनिकेवर आयकर विभागाने नुकतीच अंतरिम जप्ती आणली.

पुण्यातील वादग्रस्त बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या अनामित्रा प्रॉपर्टीज प्रा. लि. या शेल कंपनीचा वापर करून या बेनामी मालमत्तेचा व्यवहार झाला असल्याचा संशय आहे.

मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त, ऊर्जा सचिव, राज्याचे माजी मुख्य सचिव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार आदी महत्त्वाची पदे भूषवल्यानंतर महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटीचे (महारेरा) चेअरमन म्हणून नियुक्ती झालेले अजोय मेहता यांची नरिमन पॉईंट येथील समता टॉवर्सच्या (समता को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी) पाचव्या मजल्यावरील बी-5 ही 1076 चौरस फुटांची सदनिका आयकर विभागाच्या रडारवर आली आहे.

मेहता यांनी मागील वर्षी भोसले यांच्या नियंत्रणाखालील अनामित्रा प्रॉपर्टीज प्रा. लि. या शेल कंपनीकडून बाजारमूल्यापेक्षा कमी किमतीला ही सदनिका खरेदी केल्याचा आरोप आहे. दिवंगत न्या. शरद मनोहर यांच्या मुलाकडून 2009मध्ये अनामित्रा प्रॉपर्टीजने ही सदनिका 4 कोटी रुपयांना खरेदी केली होती.

मात्र, त्यासाठी या शेल कंपनीने इंडिया बुल्स फायनान्शियल सर्व्हिसेसकडून 4 कोटी 35 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. भोसले यांचे नातेवाईक आणि अनामित्रा प्रॉपर्टीजचे एक संचालक तथा सदनिकेचे कथित मालक निखिल गोखले यांनी 2020मध्ये अजोय मेहता यांना 5 कोटी 33 लाखांना या सदनिकेची विक्री केली. त्यावेळी तिचे बाजारमूल्य 10 कोटी 62 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.

बचतीमधून सदनिका घेतली : अजोय मेहता

अजोय मेहता यांनी या आरोपांचा इन्कार केला असून, आपल्या 35 वर्षांच्या सरकारी सेवेतील उत्पन्नातून केलेली बचत आणि मुदत ठेवींच्या माध्यमातून कायदेशीर मार्गाने समता टॉवर्समधील सदनिका खरेदी केल्याचे सांगितले. सरकारने निर्धारित केलेल्या बाजारमूल्याहून अधिक रक्कम या सदनिकेसाठी दिली; त्यामुळे आता आपल्या बँक खात्यात काहीही शिल्लक नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Back to top button