Victim of Trees : ‘मॉडेल रोड’साठी १८० झाडांचा बळी | पुढारी

Victim of Trees : ‘मॉडेल रोड’साठी १८० झाडांचा बळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

इंदिरानगर ते वडाळागाव दरम्यान करण्यात येणाऱ्या ‘मॉडेल रोड’च्या रुंदीकरणासाठी तब्बल १८० छोट्या-मोठ्या झाडांची कत्तल केली जाणार आहे. शहरातील हिरवळ असलेल्या मोजक्याच रस्त्यांपैकी हा एक रस्ता आहे. मात्र, रुंदीकरणामुळे या रस्त्यावरील देखील हिरवळ नष्ट होणार असल्याने, वृक्षप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे. काही दिवसांपूर्वीच वृक्षप्रेमींनी पालिका प्रशासनाविरोधात इंदिरानगर बोगद्या नजीक हातात फलक घेऊन निषेध आंदोलन केले होते. आता पुन्हा एकदा वृक्षप्रेमी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

इंदिरानगर परिसरातील वडाळागाव ते इंदिरानगर बोगदा यादरम्यान रस्ता रुंदीकरणाच्या कामाला गेल्या काही महिन्यांपासून सुरुवात केली आहे. मात्र, रुंदीकरणाच्या कामात सुमारे १८० वृक्ष अडथळे बनू पाहत असल्याने, या वृक्षांची तोड करण्याचा मनपा प्रशासनाने निर्णय घेतला होता. तत्पूर्वी याविषयी नागरिकांच्या हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार अनेक वृक्ष प्रेमींसह वृक्ष बचाव संघटनांनी त्यास हरकत नोंदविली होती. मात्र, अशातही महापालिका आपल्या निर्णयावर ठाम असल्याने पालिका प्रशासन केवळ ठेकेदारांचे हित जपण्यासाठी १८० वृक्षांची कत्तल करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप वृक्षप्रेमींकडून केला जात आहे. वास्तविक पिंपळ, वड, औदुंबर, बेल आदी वृक्षांची तोड करू नये असे न्यायालयाचे आदेश आहेत. हे वृक्ष रस्ते कामांसाठी अडथळे ठरत असतील तर रस्ता अन्य मार्गाने वळविण्याचे तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षाजवळ वाहतूक बेट तयार करून ही झाडे वाचविण्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. मात्र, असे असतानाही पालिका प्रशासनाकडून न्यायालयाचे आदेश झुगारत झाडांची कत्तल करण्याचा घाट घातला जात आहे. दरम्यान, पालिका प्रशासनाच्या या निर्णयाबद्दल पुन्हा एकदा वृक्षप्रेमींमध्ये संतापाची लाट निर्माण होण्याची शक्यता असून, वृक्षप्रेमींकडून न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण पालिका प्रशासनाकडून तोडल्या जाणाऱ्या वृक्षांमध्ये काही राष्ट्रीय दर्जा प्राप्त वृक्षांचाही समावेश असून, त्यांची तोड करणे म्हणजे न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करण्याचा प्रकार पालिका प्रशासनाकडून होत असल्याचा आरोप वृक्षप्रेमींकडून केला जात आहे.

संबंधित बातम्या

हेही वाचा:

Back to top button