राहुरी : ‘शासन आपल्या दारी’ हेच सरकारचे अपयश : आ. प्राजक्त तनपूरे | पुढारी

राहुरी : ‘शासन आपल्या दारी’ हेच सरकारचे अपयश : आ. प्राजक्त तनपूरे

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : जाहिरातबाजीमध्ये कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी करीत शासन आपल्या दारी म्हणणार्‍यांनी जनसामन्यांची अवस्था वाईट केली आहे. राज्यभरात महाऑनलाईन पोर्टल चालत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. राहुरी हद्दीतील सर्वसामान्यांसह आमदारांना शासकीय कामे करून घेण्यासाठी शासनाच्या दारी यावे लागते हेच शासन आपल्या दारी योजनेचे अपयश असल्याचे मत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले. राहुरी महसूल प्रशासनाचे तहसीलदार चंद्रजित रजपूत व आ. तनपुरे यांच्यातील संघर्ष चिघळल्याचे दिसून आले.

प्रांताधिकारी किरण सावंत यांनी घेतलेल्या बैठकीत चार महिन्यांपासून महसूल प्रशासनाने संजय गांधी निराधार योजनेची बैठक घेतली नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर तहसीलदार रजपूत यांनी 19 जून रोजी बैठक घेतल्याचे सांगितले. महसूल प्रशासनातील बेबनाव उघड झाल्यानंतर आ. तनपुरे यांनी महसूल कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज केलेले लाभार्थी व सर्वसामान्यांसह मोर्चा काढत महसूल प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झालीच नसल्याचे सांगतात तर तहसीलदार पत्र पाठवून बैठक घेतल्याचे सांगतात. हा दुटप्पी प्रकार कशासाठी? असा प्रश्न विचारताच महसूल प्रशासनाकडून कोणतेही उत्तर आले नाही. अधिकार्‍यांकडून आ. तनपुरे यांना उत्तरे देताना चांगलीच भंबेरी उडाल्याचे दिसून आले.

याप्रसंगी आ. तनपुरे यांनी अतिवृष्टी निधी, सतततच्या पावसाचा निधी याबाबत महसूल प्रशासनाला प्रश्न विचारले. वर्ष झाला तरी गतिमान शासनाने पैसे दिले नाही.. शासनाकडून निधी मिळाल्यानंतर शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पैसे जमा करू असे प्रशासनाकडून उत्तर मिळाले. शेतकर्‍यांना द्यायला पैसे नाही, परंतु स्वतःचा गवगवा करण्यासाठी जाहिरातीला कोट्यवधी रूपयांची उधळण करण्यासाठी शिंदे-फडणवीस शासनाकडे पैसा असल्याची टिका आमदार तनपुरे यांनी केली. गतिमान शासनाच्या दुर्लक्षित भुमिकेमुळे महाऑनलाईन पोर्टल गतिमंद झाले. विद्यार्थ्यांना दाखले मिळेना. अनाधिकृत सेतू चालक व अतिरीक्त पैसे घेणार्‍यांचा बंदोबस्त करावा.

महाऑनलाईन पोर्टल दुरूस्तीसाठी पाठपुरावा करीत विद्यार्थ्यांना वेळेवर दाखले मिळावेत. जनसामन्यांची कामे वेळेवर व्हावीत, महसूल प्रशासनाकडून अडचण होऊ नये हेच ध्येय ठेवत आम्ही महसूलवर मोर्चा काढला आहे. आमदारांना खोटी माहिती दिली जात असेल तर सर्वसामान्यांची काय? असा प्रश्न विचारत संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना तत्काळ योजनेअंतर्गत निधी सुरू करण्यांची मागणी केली.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, उपसभापती गोरक्षनाथ पवार, रविंद्र आढाव, सुरेशराव निमसे, भारत तारडे, बाळासाहेब देशमुख, माणिक कोकाटे, वेणूनाथ कोतकर, किरण कडू, भारत भुजाडी, प्रभाकर गाडे, ज्ञानेश्वर बाचकर, किरण गव्हाणे, कुंडलिक खपके, अ‍ॅड. राहुल शेटे, संतोष आघाव, अशोक कदम, बापुसाहेब कोबरणे, ज्ञानेश्वर जगधने आदींची उपस्थिती होती.

आ. तनपुरेंमुळेच आम्हाला लाभ

संजय गांधी निराधार योजनेचे 210 जणांचे अर्ज मंजूर तर 49 अर्जदारांना तुटी कळविण्यात आल्या. आ. तनपुरे यांनी केलेल्या पाठपुराव्यानेच संजय गांधी निराधार योजनेचे आम्ही लाभार्थी झालो असे लाभार्थी आंदोलकांनी व्यक्त केले.

हेही वाचा

देवठाणकरांची पाण्याची तृष्णा भागणार : केंद्रीय राज्यमंत्री पटेल

केवायसी अपडेट करून घ्‍या, अन्यथा खात्यातील व्यवहारात येतील अडचणीत

मावळातील पवना धरणात केवळ 17 टक्के साठा

Back to top button