Nashik bribe : शिक्षण विभागाच्या वरिष्ठ सहायकाला लाच प्रकरणी अटक | पुढारी

Nashik bribe : शिक्षण विभागाच्या वरिष्ठ सहायकाला लाच प्रकरणी अटक

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा

जिल्हाभर लाचखोर अधिकाऱ्यांना पकडण्याच्या घटना सुरू असतानाच, शुक्रवारी (दि. 16) पुन्हा येथे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ सहायकाला दोन हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे. गेल्या दोन महिन्यांत येवल्यातील ही तिसरी घटना आहे.

या घटनेत तक्रारदार उपशिक्षक असून, त्यांचे व त्यांच्या पत्नीचे अंतिम देयक तयार करून देण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना येवला पंचायत समितीतील वरिष्ठ सहायकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. संजय रामदास पाटील असे या लाच मागणाऱ्या वरिष्ठ सहायकाचे नाव आहे. जिल्ह्यातील शिक्षण विभागासह इतर शासकीय कार्यालयांतील लाचखोरीच्या घटना व त्यावर होणारी चर्चा ताजी असतानाच या घटनेमुळे पुन्हा एकदा जिल्ह्याचे शिक्षण क्षेत्र हादरले आहे. अंतिम देयक तयार करून देण्यासाठी लाचेच्या तगाद्यामुळे वैतागलेल्या संबंधित उपशिक्षकाने लाचखोर वरिष्ठ सहायकाला पकडून दिले आहे. दरम्यान या कारवाईनंतर शिक्षण विभागामध्ये खळबळ उडाली असून, वरिष्ठ सहायक पाटील याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे – वालावलकर, अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. पोलिस निरीक्षक साधना भोये – बेलगावकर अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, जूनच्या पहिल्या आठवड्यात येथे एका पोलिसाला, तर मेच्या पहिल्या आठवड्यात पंचायत समितीच्या एका विस्तार अधिकाऱ्यालाही लाच घेताना पकडले आहे. त्यानंतर ही तिसरी घटना असल्याने शासकीय कार्यालयातील लाचेच्या प्रकाराची जोरदार चर्चा रंगत आहे.

हेही वाचा:

Back to top button