मान्सूनच्या पावसावर पडले अंदाजांचे पाणी; २३ जूनपासून सक्रिय होण्याचा नवा अंदाज | पुढारी

मान्सूनच्या पावसावर पडले अंदाजांचे पाणी; २३ जूनपासून सक्रिय होण्याचा नवा अंदाज

रायगड; पुढारी वृत्तसेवा :  पाऊस कोकणात दाखल झाला असला तरी त्याचा पुढील प्रवास खोळंबला आहे. नैऋत्य मोसमी वारे १५ जूनला संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज फोल ठरला असून, आता २३ जूनपासून मोसमी वारे महाराष्ट्रासह मध्य भारतात सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मान्सूनचा पाऊस विलंबाने दाखल होण्याचा आता इतिहास बनू लागला आहे. गेल्या तीन वर्षाचा आढावा घेतला तर नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रात २०२२ मध्ये १३ ते १६ जूनदरम्यान, २०२१ मध्ये ११ ते १७ जूनदरम्यान, २०२० मध्ये १४ जून रोजी तर २००९ मध्ये सर्वात उशिरा म्हणजे २१ जून रोजी मोसमी पाऊस दाखल झाला होता. नैऋत्य मोसमी वारे ११ जूनला तळकोकणात दाखल झाले. मात्र, त्यांची वाटचाल थांबली आहे.

हवामान विभागाने येत्या चार आठवडय़ांचा पावसाचा विस्तारित अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार २३ जूनपासून महाराष्ट्रासह मध्य भारतात मोसमी पाऊस सुरू होण्यास पोषक वातावरण तयार होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली. राजस्थान वगळता देशाच्या अन्य भागांत मोसमी पाऊस २३ जूननंतर सक्रिय होईल असा अंदाज हवामान विभागाने बांधला आहे. मोसमी वारे १६ ते २२ जून या काळात ईशान्य भारत, सिक्कीम आणि बिहारच्या काही भागांत दाखल होतील.

Back to top button