फायनलमध्ये पावसाचा खेळ.. आज जमणार पुन्हा मेळ! | पुढारी

फायनलमध्ये पावसाचा खेळ.. आज जमणार पुन्हा मेळ!

अहमदाबाद : वृत्तसंस्था : आयपीएल 2023 च्या महाअंतिम फेरीत रविवारी पावसाने खोडा घातला. सायंकाळनंतर आलेला पाऊस रात्रभर मुक्कामाला राहिल्याने गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील विजेतेपदाची लढत एक दिवस पुढे ढकलून आज (सोमवारी) खेळवण्यात येणार आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे हवामान खात्याने आज पावसाची शक्यता नसल्याचे म्हटले आहे. सायंकाळी साडेसात वाजता अंतिम सामना सुरू होणार होता; परंतु पावसाने धुवाँधार बॅटिंग केल्याने पंचांनी रात्री अकरा वाजता हा सामना पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा केली.

अहमदाबादमध्ये सायंकाळी साडेसहापासून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पाऊस कमी-जास्त प्रमाणात कोसळत राहिला. फायनल कधी सुरू होणार याचा अख्खा भारत वाट पाहत असताना पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नव्हता. पावसामुळे मोटेरा मैदानाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. अखेर पंचांनी 11 वाजता अंतिम निर्णय जाहीर केला.

गुजरात टायटन्स जरी चेन्नई विरुद्धची फायनल मॅच आपल्या होम ग्राऊंड नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळत असली तरी स्टेडियमबाहेर धोनीच्या चाहत्यांची गर्दी दिसत होती. धोनीचा शक्यतो शेवटचा आयपीएल सामना असेल असे समजून पाहण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्याच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती.

Back to top button