Cyclone Mocha: बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्रीवादळ आज सायंकाळपासून सक्रिय होणार; IMD चे संकेत | पुढारी

Cyclone Mocha: बंगालच्या उपसागरात 'मोचा' चक्रीवादळ आज सायंकाळपासून सक्रिय होणार; IMD चे संकेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंगालच्या उपसागरात आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने ‘मोचा’ नावाच्या चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आली होती. या ‘मोचा’ चक्रीवादळासाठी आज (दि.०९) सायंकाळपासून (Cyclone Mocha) परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे हे चक्रीवादळ हळूहळू तीव्र होणार असल्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहेत. हे कमी दाबाचे क्षेत्र वाढत जाऊन बंगालच्या उपसागरातील पूर्व-मध्य भागात तसेच अंदमानच्या उपसागरात १० मे च्या दरम्यान चक्रीवादळाची निर्मिती होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पुढे मोचा हे चक्रीवादळ १२ मे पर्यंत उत्तर, ईशान्य आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरातून म्यानमारकडे सरकणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

जागतिक हवामान संघटनेने (WMO) या संभाव्य वादळाला ‘सायक्लोन मोचा’ असे नाव दिले आहे. या वर्षातील हे पहिलेच वादळ आहे. मोचा चक्रीवादळ बंगालच्या हवामानावर तसेच संपूर्ण उत्तर भारतावर परिणाम करेल. त्याचबरोबर ९ ते १२ मे दरम्यान जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवली आहे.

मोचा हे चक्रीवादळ आज सायंकाळपासून बंगालच्या उपसागरात सक्रिय होणार असून परिणाम भारतातील अनेक भागांवर होणार आहे. बंगालचा उपसागर, निकोबार बेट, दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा या भागावर या चक्रीवादळाचा परिणाम जाणवणार असून, या प्रदेशातील भागात विजांच्या कडकडाटासह वादळी स्वरूपाचा हलका ते मध्यम पाऊस होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने दिली आहे. तसेच या दरम्यान जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि लगतच्या उत्तराखंड आणि दक्षिण छत्तीसगडमध्ये देखील वाऱ्याच्या मध्यम प्रवाहामुळे विजांच्या कडकडाटासह वादळी स्वरूपाचा हलका ते मध्यम पाऊस पडणार असल्याचे देखील हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Cyclone Mocha : लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला

हवामान खात्याने मच्छिमारांना रविवारपासून (दि.७) आग्नेय बंगालच्या उपसागरात ४०-५० किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात असलेल्या लोकांना ७ मे पूर्वी सुरक्षित ठिकाणी परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय मध्य बंगालच्या उपसागरातील लोकांना ९ मे पूर्वी परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ८ ते १२ मे या कालावधीत अंदमान आणि निकोबार बेटांजवळ पर्यटन, ऑफशोअर क्रियाकलाप आणि शिपिंगचे नियमन करण्यात यावे, असेही सुचवले आहे.

महाराष्ट्रावर काय होणार परिणाम

महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडत असतानाच, मोचा चक्रीवादळाचं संकट आलं आहे. याच्या परिणामस्वरूप राज्यातील मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, नांदेड, लातूर, मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आदी जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हेही वाचा:

Back to top button