Rain Update : तज्ज्ञ म्हणतात यंदा पावसाचे दिवस कमीच..! अल निनोमुळे अवकाळी पावसाला फटका बसणार | पुढारी

Rain Update : तज्ज्ञ म्हणतात यंदा पावसाचे दिवस कमीच..! अल निनोमुळे अवकाळी पावसाला फटका बसणार

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही वर्षांपासून वातावणात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत, यावर्षी ऐन उन्हाळ्यात गारपीट आणि अवकाळी पावसाचा शिडकावा होतो आहे, पावसाळ्यामध्ये अल निनो सक्रीय राहणार असल्याचा फटका परतीच्या पावसाला बसणार असल्यामुळे यंदा मराठवाड्यात पावसाचे दिवस कमीच राहणार असल्याचे एमजीएम विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले. (Rain Update)

मराठवाडा (Marathwada) हा हमखास परतीच्या पावसाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो, या संदर्भात वातावरणात होत असलेल्या बदलाबद्दल औंधकर म्हणाले की, १५ सप्टेबर ते १ ऑक्टोबर या कालवधीमध्ये परतीचा पाऊस होते मात्र यावर्षी ऐन पावसाळ्यात अल निनो समुद्र प्रवाह सक्रीय राहणार आहे, या बदललेल्या वातावरणाचा परतीच्या पावसाला फटका बसणार आहे, या कालावधीत अत्यल्प पाऊस होण्याची शक्यता आहे. वातावरणात बदल होत असल्यामुळे यावर्षी कडक उन्हाचेही दिवस कमी राहणार आहे, त्यामुळे सध्या कडक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कधी ऊन, कधी ढगाळ वातावरण (Climate) तर कधी अवकाळीचा शिडकावा होत आहे, त्याच प्रमाणे यंदा पावसाळ्यातही अशीच स्थिती राहणार आहे, कधी पाऊस तर कधी ऊन अशी स्थिती राहणार आहे त्यामुळे जून ते सप्टेबर या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये एकूण पावसाचे दिवसही कमी राहतील तसेच गेले दोन वर्ष ज्या प्रमाणे जोरदार पाऊस झाला, धरणे ओसंडून वाहिली ती परिस्थिती यंदा राहणार नसल्याचे औंधकर यांनी सांगितले.

‘मोचा’ चक्रीवादळामुळे रखरखीत ऊन

मोचा चक्रीवादळाचा राज्यातही परिणाम होणार असल्याचे श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले, ते म्हणाले की, ६ किंवा ७ मे रोजी ‘मोचा’ चक्रीवादळ म्यानमारला धडकण्याची शक्यता आहे मात्र त्याचा परिणाम आपल्याकडे होणार आहे. या चक्रीवादळामुळे वातावरणातील आद्रता कमी होणार असून १६ मे पर्यंत वातावरणात कोरडेपणा तसेच रखरखीत ऊन राहणार असल्याचे औंधकर यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button