नाशिक : ट्रेनर विमानांसाठी सात हजार कोटी मंजूर | पुढारी

नाशिक : ट्रेनर विमानांसाठी सात हजार कोटी मंजूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (एचएएल) कंपनीला विमानांच्या निर्मितीसाठी 6 हजार 828 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या कंपनीत एचटीटी 40 मॉडेलच्या विशेष ट्रेनर विमानांची निर्मितीचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय रक्षामंत्री राजनाथ सिंह यांनी ओझरस्थित एचएएलला 70 एचटीटी 40 एअरक्राफ्ट निर्मितीसाठी सहा हजार 828 कोटींचा निधी मंजूर केला आहे. यासाठी डॉ. भारती पवार यांनी एचएएल ओझर येथील अखंड कनेक्टिव्हिटी व तेथील उपलब्ध मनुष्यबळाची संख्या लक्षात घेता व विविध प्रकारची यशस्वी विमाने तयार करण्याचा एचएएल प्रशासनाचा अनुभवांच्या जोरावर हे काम एचएएल कंपनीला मिळावे, यासाठी रक्षामंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. दरम्यान, नवी दिल्ली येथे संरक्षण मंत्रालयात मंत्री डॉ. पवार यांनी रक्षामंत्री यांची भेट घेऊन चर्चा केली. केंद्रीय रक्षामंत्री राजनाथ सिंह यांची नाशिककरांविषयी असलेला विशेष स्नेह व आपुलकी असल्याने नाशिक जिल्ह्याला देशाचे संरक्षण करणारे विमाने तयार करण्याचा बहुमान मिळाला आहे. नाशिकला सर्वोतोपरी मदतीचे सुतोवाच केले. न्यू इंडिया 2022 रणनीती अंतर्गत भारताने सर्व क्षेत्राचा समतोल विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या निर्णयाने एचएएल कंपनीतील सुमारे तीन हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हाताला काम मिळणार असून, एचएएल नाशिक विभागात उपलब्ध असलेले कौशल्य आणि पायाभूत सुविधांचा लाभ घेण्यासाठी संरक्षण क्षेत्रामध्ये विविधीकरणाच्या दिशेने पावले उचलल्याने डॉ. पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रक्षामंत्री राजनाथ सिंह यांचे विशेष आभार मानले आहेत.

एचटीटी 40 जातीच्या विमानांचा ताशी स्पीड 400 कि.मी. असून, विमान एकाच वेळेस तीन तास हवेत राहू शकणार आहे. आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्टानुसार सदरचे विमान हे पूर्णत: भारतीय बनावटीचे असणार आहे– डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री.

हेही वाचा:

Back to top button