नाशिक : पेशव्यांचे प्रमुख रंगराम ओढेकर यांनी गोपिकाबाई पेशव्यांच्या आदेशानुसार काळाराम मंदिराची १९८२ साली स्थापना केली. प्रभू रामचंद्र आपल्या वनवासादरम्यान ज्या जागी राहिले त्या ठिकाणी हे मंदिर होते अशी धारणा आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी दोन हजार कारागीर १२ वर्षे काम करत होते. पश्चिम भारतातील प्रभू रामचंद्राच्या सुंदर मंदिरांपैकी एक काळाराम मंदिर आहे. सुमारे २४५ फूट लांब व १४५ फूट रुंद मंदिर परिसराला १७ फूट उंच दगडाची भिंत आहे. मंदिरासाठी सर्व बाजूंनी मोकळा असलेला स्वतंत्र सभामंडप आहे. जिथे भजन, कीर्तन आयोजित केले जातात. मंदिरात प्रभू रामचंद्र, सीता, लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातील दोन फूट उंचीच्या मूर्ती आहेत. मंदिराचे संपूर्ण बांधकाम काळ्या दगडात केले गेले आहे आणि बांधकामाची शैली हेमाडपंती पद्धतीकडे झुकणारी आहे. मंदिरावरील कोरीव काम बघण्यासारखे आहे. मंदिरातील रामाची मूर्तीदेखील काळ्या दगडाची आहे. म्हणून त्याला काळाराम म्हणतात.
लक्ष्मणाने पंचवटीत शूर्पनखेचे नाक, कान कापल्यानंतर १४ हजार राक्षस याठिकाणी रामावर हल्ला करण्यासाठी आले होते. तेव्हा रामाने छातीवर हात ठेवून प्रतिज्ञा केली आणि १४ हजार राक्षसांचा वध केल्यानंतर रामाने विराट काल स्वरूप धारण केले होते म्हणून काळाराम नाव प्रसिद्ध झाले. अशी आख्यायिका सांगितली जाते.
काळाराम मंदिराच्या शिखरावर सोन्याचा मुलामा चढवण्यात आला आहे. चैत्र महिन्यात येथे रामनवमीचा उत्सव आयोजित करण्यात येतो. काही नागपंथी साधूंना गोदावरीच्या पात्रात राम-लक्ष्मण-सीतेच्या मूर्ती सापडल्या. रामाची मूर्ती रामकुंडात, लक्ष्मणाची मूर्ती लक्ष्मण कुंडात, सीतेची मूर्ती सीताकुंडात सापडली. या मूर्ती स्वयंभू म्हणून ओळखल्या जातात. भारतातील दलित चळवळीत मंदिराची महत्त्वपूर्ण भूमिका होती. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून २ मार्च १९३० रोजी मंदिराबाहेर मोठे आंदोलन उभे केले होते.
हेही वाचा :