IWD 2023 : स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं : राज ठाकरे | पुढारी

IWD 2023 : स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं : राज ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. मार्च महिन्याच्या आठ तारखेला दरवर्षी महिला दिन साजरा केला जातो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिला दिनानिमित्त ट्विटर नोट लिहित स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं असं म्हंटलं आहे. वाचा राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये काय लिहलं आहे ते. (IWD 2023)

 IWD 2023 : संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक

राज ठाकरे यांनी लिहलेल्या ट्विटर नोटमध्ये म्हंटलं आहे की,”आज जागतिक महिला दिन. सर्वप्रथम तमाम स्त्रीवर्गाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.

सगळ्या चौकटी मोडून, आज सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरु आहे ती थक्क करणारी आहे. आज ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील, इथल्या मुलींना उच्च शिक्षणाची, स्वतःच करिअर घडवायची प्रचंड ओढ आहे. त्यासाठी त्या घरापासून लांब, इतर शहरात किंवा परदेशात नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने सहज स्थिरावत आहेत, आणि जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे. (IWD 2023)

१००, १५० वर्षांपूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून प्रचंड संघर्ष करावा लागत होता अशी परिस्थिती होती. आणि त्याच समाजात मोठमोठ्या उद्योगसमूहांच्या व्यवस्थापनापासून ते जागतिक अर्थकारणात उलाढाली करणाऱ्या संस्थांमध्ये मोठ्या पदांवर स्त्रिया कार्यरत आहेत. इतकंच काय देशाची अर्थव्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, सीमांचं संरक्षण ते थेट राष्ट्रपतीपदी स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत. आणि हे सर्व त्यांनी निव्वळ स्वकर्तृत्वावर कमावलं आहे.

म्हणूनच आता स्त्रियांनी राजकारणात देखील मोठ्या प्रमाणावर यायला हवं. ‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं’ हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ध्येय आहे आणि हे साध्य करायचं असेल तर स्त्रियांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे, याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच विविध क्षेत्रांत स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे.

पुन्हा एकदा सर्व महिलांना, जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

हेही वाचा 

Back to top button