ठाकरेंच्या त्या वक्तव्याबाबत संजय राऊत म्हणाले, युती पुन्हा जुळणे अशक्य | पुढारी

ठाकरेंच्या त्या वक्तव्याबाबत संजय राऊत म्हणाले, युती पुन्हा जुळणे अशक्य

मुंबई, पुढारी ऑनलाईन: महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालविणे ही शिवसेनेची बांधिलकी आहे, त्यामुळे युती पुन्हा जुळणे अशक्य आहे. पाठीत खंजीर खुपसणे ही शिवसेनेची संस्कृती नाही. भाजपने युती तोडली आहे. त्यामुळे पुन्हा जुळण्याची शक्यता नाही, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत दिले.

संजय राऊत युती बाबत म्हणाले, ‘महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बोलण्याची ठाकरी शैली आहे.

त्या शैलीत ते बोलले आहे. ठाकरे यांनी युतीबाबत बोलल्यानंतर काहींनी पतंग उडवायला सुरुवात केली.

मात्र, शिवसेना कधी खंजीर खुपसत नाही. ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगती करत आहे.’

ते म्हणाले, ‘ शिवसेना भवन तोडण्याची, मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्यांशी कशी युती करायची?

आधीची युती भाजपने तोडली आहे, शिवसेनेने नव्हे. भाजपमधील अनेकजण शिवसेनेत येत आहेत.

त्यामुळे आम्ही निवांत आहोत. ज्यांना मनात मांडे खायचे त्यांना खाऊ द्या.’

भावी सहकारी म्हणजे काय? ठाकरेंनी सांगितला अर्थ

भूमिपूजनाच्या भाषणात भाजप नेत्यांना भावी सहकारी संबोधून युतीची चर्चा घडवल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र नंतर राजकीय अंदाजाचे विमान सरळ खाली उतरवले. भाजप नेत्यांना भावी सहकारी संबोधले याचा अर्थ काय? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी काळावर सोपवले. उद्धव ठाकरे म्हणाले, सर्व काही काळच ठरवेल. अलीकडे राजकारणाला अतिशय विकृत स्वरूप येताना दिसत आहे. हे प्रकार थांबले पाहिजेत. राजकीय विसंवादाचा परिणाम विकासकामांवर होतो. त्यामुळेच आपण ‘आजी-माजी सहकारी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी,’ असा उल्लेख केला.

काय म्हणाले मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात भाषणापूर्वी व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधित करताना आजी-माजी सहकाऱ्यांचा उल्लेख केला. मात्र, यावेळी मागे बघून त्यांनी भावी सहकारी म्हणून देखील संदर्भ दिला. त्यामुळे भविष्यात शिवसेना आणि भाजप एकत्र येणार असल्याची चर्चा यावरून सुरू झाली आहे. भाषणाच्या सुरूवातीला “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी”, असा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्यामुळे त्यावरून वेगवेगळे तर्क काढले जात आहेत.

हेही वाचा: 

Back to top button