प्रेमप्रकरण : पत्नीसमोर प्रेयसीसह आईवर गोळीबार

प्रेमप्रकरण : पत्नीसमोर प्रेयसीसह आईवर गोळीबार
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : प्रेमप्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर पत्नी, प्रेयसी व तिची आई यांच्यातील जोरदार खडाजंगीमुळे संतापलेल्या तरुणाने पत्नीसमोरच छर्‍याच्या बंदुकीतून प्रेयसी व तिच्या वृद्ध आईवर शुक्रवारी गोळीबार केला. दोघींची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रेमप्रकरण यातून गोळीबाराच्या घटनेची माहिती  शहरात वाऱ्यासारखी पसरली. प्रेमप्रकरण यातून कळंबा तलावाजवळील बंधार्‍यावर शुक्रवारी सकाळी हे थरारनाट्य घडले. हल्लेखोर प्रियकराला सायंकाळी अटक करण्यात आली. त्याच्याकडून छर्‍याची बंदूक, मोटार हस्तगत करण्यात आली आहे.

ऋषीकेश बाबुराव कोळी (वय 30), पत्नीअर्चना ऋषीकेश कोळी (27, रा. मगदूम कॉलनीजवळ, पाचगाव, ता. करवीर) असे दाम्पत्याचे नाव आहे. त्यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर अर्चना कोळी पळून गेली आहे. तिचा शोध सुरू आहे.

करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर यांनी ही माहिती दिली. पीडित तरुणीला तोंडावर दोन, पोटावर तीन ठिकाणी,

तर वृद्धेच्या पोटावर गंभीर इजा झाली आहे. रात्री उशिरा माय-लेकीवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित ऋषीकेश विवाहित आहे. परिसरात राहणार्‍या तरुणीशी त्याची ओळख झाली. चॅटिंगमुळे दोघांत जवळीकता वाढत गेली.

शुक्रवारी सकाळी तरुणीने ऋषीकेशच्या मोबाईलवर काही आक्षेपार्ह मेसेज पाठवले. नेमका यावेळी मोबाईल पत्नी अर्चनाकडे होता. तिने तो मेसेज वाचला. त्यानंतर दोघांत जोरदार वादावादी झाली.

संतापलेल्या अर्चनाने या तरुणीशी मोबाईलवर संपर्क साधला. त्यांच्यात शिवीगाळ सुरू झाली. दहा-पंधरा मिनिटे हा प्रकार सुरू होता. भेदरलेल्या तरुणीने मोबाईल आईकडे दिला.

अर्चनाने संबंधित तरुणीच्या वृद्ध आईलाही शिवीगाळ केली.

वाद टोकाला गेल्यानंतर तरुणीच्या आईने एक पाऊल मागे घेत समोरासमोर चर्चा करून वादावर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला.

तरुणीसह तिच्या आईला शिवीगाळ; वादावादी

संशयित अर्चना हिने चर्चा करण्यासाठी पतीसह आपण स्वत: येत असल्याचा निरोप दिला. त्यावर वृद्धेने आमच्या घराकडे नको, त्यापेक्षा कळंबा तलावाजवळील बंधार्‍यावर मुलीसह मी स्वत: येत असल्याचे सांगितले.

सकाळी सातच्या दरम्यान संशयित ऋषीकेश, पत्नीसह मोटारीतून येऊन थांबला होता. साडेसातला तरुणी व तिची आई तेथे आली. त्यांच्यात जोरदार वादावादी झाली.

25 फुटांवरून गोळीबार

तरुणीसह आईला शिवीगाळ करत अर्चना दोघींच्या अंगावर धावून गेली. तरुणीला तिने मारहाणही केली.

मुलीची सुटका करण्याच्या प्रयत्नात वृद्धेलाही मारहाण झाली. दोन्हीकडून झटापट सुरू होती.

याचवेळी शेजारी थांबलेला ऋषीकेश मोटारीकडे धावत गेला. मोटारीतून छर्‍याची बंदूक काढली आणि माय-लेकीच्या दिशेने रोखली. त्यानंतरही भांडण वाढतच गेले.

त्यामुळे त्याने संतापून 25 ते 30 फूट अंतरावरून दोघींवर गोळ्या झाडल्या. तोंडावर, पोटावर इजा झाल्याने माय-लेकी रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळल्या.

पोलिसांचा फौजफाटा दाखल

आरडाओरड व गोळीबार झाल्याने घटनास्थळाकडे नागरिकांनी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.  नागरिकांची गर्दी झाल्यावर ऋषीकेश आणि अर्चना मोटारीतून पसार झाले.

माय-लेकीवर गोळीबार झाल्याची बातमी वार्‍यासारखी पसरताच पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे,

अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलिस उपअधीक्षक आर. आर.पाटील, निरीक्षक संदीप कोळेकर, एलसीबीचे निरीक्षक प्रमोद जाधव यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

गोळीबारात जखमी झालेल्या माय-लेकीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पोलिसांनी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले.

त्यांना कोणत्या रुग्णालयात दाखल केले त्याची माहिती न मिळाल्याने त्यांना शोधून काढताना पोलिसांची बरीच तारांबळ उडाली.

या घटनेमुळे माय-लेकी भेदरल्या होत्या.

तरुणीच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता. अधिकार्‍यांनी त्यांना विश्वासात घेऊन धीर दिल्यानंतर सायंकाळी वृद्ध मातेने संशयिताविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news